Nashik: आधार केंद्रासाठी मदतीचा बहाणा; ८८ लाखांत घातला गंडा
By दिनेश पाठक | Updated: July 12, 2024 19:59 IST2024-07-12T19:59:05+5:302024-07-12T19:59:17+5:30
Nashik News: आधार सेवा केंद्र सुरू करण्यासाठी मदत करतो अशी बतावणी करत शहरातील एका संशयिताने ओळख झालेल्या ठाणे येथील ई सेवा केंद्र चालकाच्या करंट अकांऊटमधून ८७ लाख ८९ हजार ४१५ रुपयांचा ओव्हरड्राफ्ट व्यवहार करुन गंडा घातला.

Nashik: आधार केंद्रासाठी मदतीचा बहाणा; ८८ लाखांत घातला गंडा
- दिनेश पाठक
नाशिक - आधार सेवा केंद्र सुरू करण्यासाठी मदत करतो अशी बतावणी करत शहरातील एका संशयिताने ओळख झालेल्या ठाणे येथील ई सेवा केंद्र चालकाच्या करंट अकांऊटमधून ८७ लाख ८९ हजार ४१५ रुपयांचा ओव्हरड्राफ्ट व्यवहार करुन गंडा घातला.
केंद्र चालकास सात लाख रुपयांची गरज होती. त्याचा फायदा घेत भामट्याने मदतीच्या बहाण्याने फसवणूक केली. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील स्वप्निल बनसोडे (३४) यांनी आडगाव पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद नोंदविली. बनसोडे यांचे ई सेवा केंद्र आहे. त्यांना आधार सेवा केंद्र सुरू करायचे होते. त्यासाठी त्यांनी शासकीय पातळीवर प्रयत्न केले, परंतू त्यात त्यांना अपयश आल्याने ते त्यासाठी मदत शोधू लागले अन् फसवणुकीच्या जाळ्यात अडकले. नातलगांच्या ओळखीच्या माध्यमातून त्यांची नाशिकमधील संशयित अनिल पवार याच्याशी ओळख झाली. पवार यांनी आधार केंद्र सुरू करून देऊ शकतो. त्यासाठी आपली खूप ओळख असल्याची बतावणी केली. नाशिक शहरातील नांदुरनाका येथील हॉटेल प्रेस्टीज येथे २ जुलैला दोघे भेटले.
स्वप्निल यांना आधार केंद्र सुरू करण्यासाठी पैशांची गरज असल्याचे लक्षात आल्याने संशयित अनिल याने ७ लाख रुपयांची मदत करण्याचे आमीष दाखवले. मात्र त्यासाठी स्वप्निल यांच्या बँक खात्यातील करंट अकांऊटचा नंबर अनिलने मागितला. त्यानुसार स्वप्निलने बँक खात्याची माहिती व पासवर्ड आणि बँक खात्यात लिंक असलेले सीमकार्ड संशयितास दिले. त्यानंतर २ ते ३ जुलै दरम्यान, संशयिताने बँक खात्यातून पैसे काढून दुरुपयोग केला. तसेच ओव्हर ड्राफ्ट (खाते वजा व तोट्यात) करुन पैसे वापरून स्वप्निल यांची आर्थिक फसवणूक केली. आडगाव पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक निखिल बोंडे करत आहेत.