नाशिकमध्ये जुलूस-ए-गौसिया उत्साहात; शेकडो मुस्लीम बांधव सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 06:05 PM2017-12-30T18:05:43+5:302017-12-30T18:07:16+5:30
अग्रभागी सजविलेल्या जीपमध्ये खतीब मिरवणूकीचे नेतृत्व करीत होते. त्यांच्यासोबत शहर-ए-काझी सय्यद मोईजोद्दीन, हाजी वसीम पिरजादा होते. तसेच गौस ए आझम यांच्या जीवनकार्याविषयीची माहिती हाजी सय्यद मीर मुख्तार अशरफी देत होते.
नाशिक : मुस्लीम समाजाचे ज्येष्ठ धर्मगुरू सुफी संत हजरत शेख अब्दुल कादिर जीलानी ऊर्फ गौस-ए-आझम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जुने नाशिक परिसरासह वडाळागावातून ‘जुलूस-ए-गौसिया’ मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
जुने नाशिकमधून शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते. चौक मंडई येथून दुपारी चार वाजता मिरवणूकीला प्रारंभ करण्यात आला. प्रारंभी अशरफी यांनी देशाच्या प्रगती व कल्याणासाठी तसेच शांतता व एकात्मता जोपासली जावी, याकरिता प्रार्थना केली. यावेळी उपस्थितांनी ‘आमिन’ म्हणत त्यांच्या प्रार्थनेला पाठिंबा दिला. यावेळी मिरवणूकीत जुने नाशिकसह विविध उपनगरांमधील धार्मिक- सामाजिक मित्र मंडळांनी सहभाग नोंदविला होता. तसेच मदरसा गौस-ए-आझम, मदरसा सादिकुल उलूमचे विद्यार्थी पारंपरिक पोशाखात सहभागी होऊन शिस्तबध्द संचलन करीत होते. प्रत्येक मंडळांच्या कार्यकर्त्याकडून दरूदोसलाम व गौस-ए-आझम यांच्यावर आधारित स्तुतीपर काव्य म्हटले जात होते. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी विविध मंडळांनी धर्मगुरूंचे स्वागत केले. मिरवणूक मार्ग हिरवे झेंडे, आकर्षक होर्डिंग्ज उभारून सजविण्यात आला होता. अग्रभागी सजविलेल्या जीपमध्ये खतीब मिरवणूकीचे नेतृत्व करीत होते. त्यांच्यासोबत शहर-ए-काझी सय्यद मोईजोद्दीन, हाजी वसीम पिरजादा होते. तसेच गौस ए आझम यांच्या जीवनकार्याविषयीची माहिती हाजी सय्यद मीर मुख्तार अशरफी देत होते.
मिरवणूक चौक मंडई, बागवानपुरा, कथडा, शिवाजी चौक, आझाद चौक, चव्हाटा, बुधवार पेठ, काजीपुरा, कोकणीपुरा, खडकाळीवरून शहीद अब्दूल हमीद चौकातून मार्गस्थ होत बडी दर्गाच्या प्रारंगणात पोहचली. या ठिकाणी धर्मगुरूंनी प्रवचन दिले. फातिहा व दरूदोसलामचे पठण करुन मिरवणूकीचा समारोप करण्यात आला. दरम्यान, पुर्वसंध्येला मुस्लीम बांधवांनी घरांमध्ये विशेष ‘मलिदा’ हे खाद्यपदार्थ तयार करुन फातिहा पठण केले.