नाशिक मालमत्ता; भुजबळांना तात्पुरता दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 06:17 AM2018-06-28T06:17:31+5:302018-06-28T06:17:34+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मालकीची नाशिक येथील २५ कोटींची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मालकीची नाशिक येथील २५ कोटींची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. त्याआधारे ईडीने पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. यासाठी भुजबळ, त्यांच्या कुटुंबियांना जामीन अर्ज करणे आवश्यक आहे का, हे विशेष न्यायालयाला स्पष्ट करावे लागणार आहे. न्यायालयाने ६ आॅगस्टला याबाबत निर्णय देऊ, असे सांगत भुजबळांसह कुटुंबियांना तोवर तात्पुरता दिलासा दिला.
ईडीने नाशिक मालमत्ता जप्तीप्रकरणी छगन भुजबळ व त्यांच्या कुटुंबियांवर पुरवणी आरोपपत्र दाखल केले. मात्र, ईडीने त्याला स्वतंत्र गुन्ह्याचे स्वरुप दिल्याने यासाठी जामीन अर्ज करायचा की नाही, असा प्रश्न भुजबळ व त्यांच्या कुटुंबियांसमोर पडल्याने त्यांनी विशेष न्यायालयात धाव घेतली.
आरोपपत्र म्हणजे स्वतंत्र गुन्हा असा विचार करता येणार नाही. तपासयंत्रणेला नवी माहिती मिळाल्यानंतर प्रत्येकवेळी जामिनासाठी बाँड देणे कायदेशीररीत्या अयोग्य आहे. तसेच एकाच गुन्ह्यासाठी दोनदा अटक करता येणार नाही.ईडीने भुजबळ व त्यांच्या कुटुंबियांवर पुरवणी आरोपपत्र दाखल केल्याचे सांगत या पुरवणी आरोपपत्राची दखल स्वतंत्र गुन्हा म्हणून करावी, अशी विनंतीही केली आहे.