यकृत-मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी नाशिक-पुणे ‘ग्रीन कॉरिडॉर
By admin | Published: May 11, 2016 12:09 AM2016-05-11T00:09:49+5:302016-05-11T00:09:52+5:30
’गरजूंना जीवनदान : सामाजिक बांधिलकी; चार तासांत गाठले पुण्याचे रुग्णालय
नाशिक : वेळ साडेअकरा वाजेची. ठिकाण मॅरेथॉन चौक, गंगापूररोड. ऋषिकेश रुग्णालयाबाहेर उभी असलेली रुग्णवाहिका व वाहतूक पोलिसांची वाहने. सर्व वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण होऊन मंगळवारी (दि.१०) सकाळी अकरा वाजून ४० मिनिटांनी वाहतूक शाखेचे अधिकारी ‘अॅलर्ट मिशन ग्रीन कॉरिडॉर’ची सूचना वायरलेसवरून देतात आणि पुढच्या पाचव्या मिनिटाला अवयव घेऊन पोलिसांच्या पायलट वाहनांबरोबर रुग्णवाहिका (एमएच १२, केक्यू १६२०) वाऱ्याच्या वेगाने पुण्याच्या दिशेने निघाली.
शनिवारी (दि.७) मेंदूला त्रास झाल्याने शोभा शंकर लोणारे (५३, रा. सिन्नर, शिवाजीनगर) यांना नाशिकच्या सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, त्यांच्यावर उपचार करून सह्याद्रीच्या वैद्यकीय सूत्रांनी ऋषिकेश रुग्णालयामध्ये सोमवारी रात्री अकरा वाजता त्यांना हलविले. आज (दि.१०) पहाटे लोणारे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
त्यांच्या नातेवाइकांना रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर व चिंताजनक असल्याची माहिती सह्याद्रीच्या वैद्यकीय सूत्रांकडून सोमवारीच मिळाली होती. पुणे येथील सह्याद्रीच्या मुख्य रुग्णालयात एक यकृताचा व दुसरा मूत्रपिंडाचा गरजू रुग्ण येथील दीनानाथ रुग्णालयात उपचारार्थ दाखल आहे. त्यांना मरणोत्तर मयताचे अवयव मिळाले तर जीवनदान मिळू शकेल, असे डॉक्टरांकडून नातेवाइकांना समुपदेशन करण्यात आले.
ऋषिकेश हॉस्पिटलचे संचालक भाऊसाहेब मोरे यांनी रुग्णाच्या नातेवाइकांना अवयवदानाचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर नातेवाइकांनी होकार दर्शविला. दरम्यान, पहाटे लोणारे यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे यकृत, मूत्रपिंड, डोळे हे अवयव सुरक्षितरीत्या गंगापूर रुग्णालयात डॉक्टरांनी काढले. दरम्यान, पावणे बारा वाजता यकृत व एक मूत्रपिंड घेऊन रुग्णवाहिका ‘ग्रीन कॉरिडॉर’च्या मदतीने सव्वा चार तासांमध्ये पुणे येथील सह्याद्री डेक्कन रुग्णालयात पोहचली. तेथे गरजू रुग्णाच्या शस्त्रक्रियेसाठी शस्त्रक्रिया केंद्र सज्ज ठेवण्यात आले होते. तत्काळ यकृत प्रत्यारोपणासाठी सह्याद्रीच्या चमूने वैद्यकीय प्रक्रिया सुरू केली. तसेच येथील दीनानाथ रुग्णालयातही मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णाला मूत्रपिंड शस्त्रक्रियेद्वारे प्रत्यारोपण करण्यात आले. तसेच दुसरे मूत्रपिंड ऋषिकेश हॉस्पिटलमध्येच गरजूला प्रत्यारोपण केले गेले. तसेच सुशील नेत्र रुग्णालयाकडे गरजूंसाठी डोळे पाठविण्यात आल्याची माहिती मोरे यांनी दिली.
पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपआयुक्त विजय पाटील, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण कदम, शंकर काळे यांच्यासह पोलीस नियंत्रण कक्ष, शहर वाहतूक नियंत्रण कक्ष, नाशिक ग्रामीण पोलीस, महामार्ग पोलीस आदिंच्या संयुक्त प्रयत्नांमुळे नाशिकमधून पहिल्यांदाच राबविण्यात आलेले ‘ग्रीन कॅरिडॉर’ मिशन फत्ते झाले. यावेळी लोणारे यांची दोन मुले, सून, भाऊ, बहीण, भावजई रुग्णालयात उपस्थित होते.