नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेचा वाढला स्पीड, १७ हजार कोटींचा डीपीआर अंतिम मंजुरीसाठी सादर
By संजय पाठक | Published: December 20, 2023 03:54 PM2023-12-20T15:54:57+5:302023-12-20T15:55:13+5:30
सुधारित डीपीआरनुसार नाशिक - पुणे सेमी हायस्पीड रेल्वेलाईन साठी १७ हजार ८८९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
नाशिक : गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या नाशिक- पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाला अखेरीस लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर चालना मिळाली असून यापूर्वी तयार करण्यात आलेल्या डीपीआर मधील त्रुटी दूर करून मध्य रेल्वे प्रशासनाने १७ हजार ८८९ कोटींचा तयार केलेला सुधारित डीपीआर (विस्तूत प्रकल्प अहवाल) अंतिम मंजुरीसाठी केंद्राच्या रेल्वे बोर्डकडे सादर केला आहे.
यापूर्वीचा डीपीआर १६ हजार ३९ कोटी रूपयांचा होता. मध्य रेल्वे प्रशासनाकडून त्रुटी मुक्त आणि परिपूर्ण असा सुधारित प्रस्ताव रेल्वे बोर्डकडे सादर झाल्याने आता लवकरच नाशिक - पुणे लोहमार्गाच्या प्रस्तावाला अंतिम मान्यता मिळणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.
सुधारित डीपीआरनुसार नाशिक - पुणे सेमी हायस्पीड रेल्वेलाईन साठी १७ हजार ८८९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पैकी बांधकामावर १५ हजार ४१० कोटी, इलेक्ट्रीक कामावर १३७९ कोटी, सिंगल अँड कम्युनिकेशनच्या कामासाठी १०८६ कोटी तर मेकॅनिकल कामासाठी साडे बारा कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. प्रकल्पाची एकूण लांबी २३३ किलोमीटर इतकी असणारा असून प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यास पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे. नाशिक - पुणे दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाडीतून प्रतिवर्ष एक कोटी तीस लाख प्रवासी प्रवास करतील असा अंदाज आहे.