नाशिक विभागात १५० टक्के विक्रमी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 10:13 PM2019-10-02T22:13:14+5:302019-10-02T22:13:46+5:30
नाशिकरोड : नाशिक विभागामध्ये यंदा जवळपास १५० टक्के पाऊस झाला असून, गेल्या ३० वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद शासन दरबारी घेण्यात आली आहे. गेल्यावर्षीपेक्षा दुप्पट पाऊस यंदा झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : नाशिक विभागामध्ये यंदा जवळपास १५० टक्के पाऊस झाला असून, गेल्या ३० वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद शासन दरबारी घेण्यात आली आहे. गेल्यावर्षीपेक्षा दुप्पट पाऊस यंदा झाला आहे.
विभागामध्ये दि. १ जून ते ३० सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत नाशिक जिल्ह्यात १०१३.४ मिमी, धुळे- ५३०.५, नंदुरबार - ८३५.८, जळगाव- ६६३.३, अहमदनगर जिल्ह्यात- ४३६.४ मिमी असा एकूण ६५९.९ मिमी पाऊस अपेक्षित होता. मात्र यंदा पावसाने कहरच केल्याने सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे परतीच्या पावसानेदेखील चांगलाच जोर लावला आहे. दि. १ जून ते ३० सप्टेंबर पावसाळा ऋतूच्या चार महिन्यांच्या कालावधीत नाशिक जिल्ह्यात १५६७.८ मिमी (१५४.७ टक्के), धुळे - ९५९ मिमी (१८०.८ टक्के), नंदुरबार- १३३६.८ मिमी. (१५९.९ टक्के), जळगाव- ७९५.७ मिमी (१२० टक्के), अहमदनगर- ५२९.५ मिमी (१२१.३ टक्के) पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
विभागातील पाचही जिल्ह्यांत १२५ टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. गेल्यावर्षी नाशिक विभागात ७५.७ टक्के पाऊस झाला होता. तालुकानिहाय पडलेला पाऊस नाशिक १२३२ मिमी (२०० टक्के), इगतपुरी- ५३०.४ मिमी (१५९ टक्के), दिंडोरी- १२१४ मिमी (१७४ टक्के), पेठ-३३४६ मिमी (१५२ टक्के), मालेगाव-६३५ मिमी (१४४ टक्के), नांदगाव-५३६ मिमी (११५ टक्के), चांदवड-६९२ मिमी (१३३ टक्के), कळवण-६८२ मिमी (१०३ टक्के), बागलाण-६६९ मिमी (१५९ टक्के), निफाड-५४१ मिमी (१२७ टक्के), सुरगाणा-२८४० मिमी (१६३ टक्के), सिन्नर-७५६ मिमी (१५४ टक्के), येवला- ७०९ मिमी (१६४ टक्के), त्र्यंबकेश्वर-३८६२ मिमी (१७६ टक्के), देवळा- ४९८ मिमी (८७ टक्के) असा एकूण नाशिक जिल्ह्यात १५६७.८ मिमी (१५४.७ टक्के) पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे.
यंदा दुप्पट पाऊस झाल्याने पाणीटंचाई व दुष्काळाचे सावट दूर झाले आहे. तर जमिनीत-देखील मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी जिरून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास चांगलीच मदत झाली आहे.