नाशिककरांना उन्हाचा चटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 11:24 PM2021-03-01T23:24:54+5:302021-03-02T02:22:40+5:30
नाशिक : शहराच्या तापमानात सातत्याने वाढ होत असून रविवारपाठोपाठ नाशिककरांना सोमवारीही (दि.१) उन्हाचा तडाखा बसला. दिवसभर वाऱ्याचा मंदावलेला वेग अन् उन्हाच्या जाणवणाऱ्या अतितीव्र झळांमुळे नाशिककर घामाघूम झाले होते. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शहरातील बहुतांश रस्ते ओस पडले होते. कमाल तापमानाचा पारा संध्याकाळी ३५.९ अंशांपर्यंत स्थिरावल्याची नोंद हवामान केंद्राकडून करण्यात आली.

नाशिककरांना आठवडाभरापासून उन्हाळा जाणवत आहे. शहराचे वातावरण कमालीचे ह्यहॉटह्ण होत असून कमाल तापमानात वाढ होत आहे. मागील आठवड्यात तिशीचा टप्पा गाठलेल्या तापमानाने आता ३५ अंशांपुढे वाटचाल सुरू केल्याने नाशिककरांना उष्म्याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. शनिवारी कमाल तापमानाचा पारा ३५.५ अंशांवर होता; मात्र रविवारपासून यामध्ये आणखी वाढ होऊ लागल्याने प्रखर उन्हाचा चटका नागरिकांना जाणवत आहे.
यासोबतच किमान तापमानदेखील सोमवारी १७.५ अंशांवर पोहोचले. शनिवारच्या तुलनेत कमाल-किमान तापमानात वाढ झाल्यामुळे नागरिकांना सोमवारी अधिकच उकाडा सहन करावा लागला. रात्रीदेखील थंड वाऱ्यांचा वेग कमीच राहिल्याने वातावरणात फारसा गारवा जाणवत नव्हता. मागील तीन वर्षांच्या तुलनेत या वर्षी प्रखर उन्हाळा राहणार असल्याची चिन्हे आताच दिसू लागली आहेत.
मार्च महिन्याला सोमवारपासून सुरुवात झाली असून कमाल तापमानात अधिक वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. विशेष म्हणजे २०१८ साली २८ फेब्रुवारी रोजी ३५.८ अंश इतके कमाल तापमान नोंदविले गेले होते. याची पुनरावृत्ती रविवारीही झाली. या वर्षीही रविवारी (दि. २८) ३५.८ इतक्याच कमाल तापमानाची नोंद झाली. या वर्षीही उन्हाच्या झळा अधिक तीव्र राहणार असल्याचे संकेत निसर्गाने दिले आहेत. यामुळे नागरिकांना आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.