नाशिककरांनी जाणून घेतली रानभाज्यांची महती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 09:43 PM2020-08-09T21:43:48+5:302020-08-10T00:30:20+5:30
नाशिक : जागतिक आदिवासी दिनानिमित्त प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात जिल्हा कृषी विभागाच्या वतीने आयोजित रानभाज्या महोत्सवास नाशिककरांचा चांगला प्रतिसाद लाभला. यावेळी नागरिकांनी वेगवेगळ्या रानभाज्या आणि त्यांचा वेगवेगळ्या आजारांमध्ये होणारा उपयोग याची माहिती संबंधित आदिवासी शेतकऱ्यांकडून जाणून घेत रानभाज्यांची खरेदीही केली.
नाशिक : जागतिक आदिवासी दिनानिमित्त प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात जिल्हा कृषी विभागाच्या वतीने आयोजित रानभाज्या महोत्सवास नाशिककरांचा चांगला प्रतिसाद लाभला. यावेळी नागरिकांनी वेगवेगळ्या रानभाज्या आणि त्यांचा वेगवेगळ्या आजारांमध्ये होणारा उपयोग याची माहिती संबंधित आदिवासी शेतकऱ्यांकडून जाणून घेत रानभाज्यांची खरेदीही केली.
प्रदर्शनाचे उद्घाटन कार्यक्रमास राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, कृषी सभापती संजय बनकर, आमदार सरोज आहेर, आमदार देवयानी फरांदे, माजी आमदार हेमंत टकले, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षक प्राचार्य संजय पाटील, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी सुनील वानखेडे, उपसंचालक कैलास शिरसाठ, प्रकल्प उपसंचालक हेमंत काळे, उपविभागीय कृषी अधिकारी संजय सूर्यवंशी, दिलीप देवरे, कैलास खैरनार, गोकुळ वाघ आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना भुसे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे स्मार्ट शेतकरी योजनेतून गट शेती व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून रानभाज्यांच्या विक्र ीसाठी शहरांमध्ये कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल. या योजनेतून शेतीमालाला गुदामे, स्टोअरेज, कोल्ड स्टोअरेजदेखील उपलब्ध करून दिले जाणार आहे. कोरोना रोगाशी सामना करण्यासाठी शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढविणे व टिकविणे गरजेचे आहे. रानभाज्या प्रथिने, पोषणद्रव्य व जीवनसत्वयुक्त असून, इम्युनिटी बुस्टर म्हणून त्यांचा निश्चितच उपयोग होऊ शकतो, असे भुसे यावेळी म्हणाले. याप्रसंगी मान्यवरांची भाषणे झाली.
कार्यक्र मात कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते विमल आचारी, मारुती पवार, मधुकर बांगारे, मनोहर चौधरी, सीताराम चौधरी, अनिल पवार तसेच आदर्श शेती शेतकरी गट या शेतकऱ्यांचा प्रातिनिधीक स्वरूपात प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच के. के. वाघ उद्यान महाविद्यालयाच्या सहायक प्राध्यापिका अश्विनी चोथे यांचादेखील यावेळी कृषिमंत्र्यांनी गौरव केला. महोत्सवाचा समारोप विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत झाला.
रानभाज्यांची पाककृती यू-ट्यूबवर टाकावी
महोत्सवात जवळपास ८६ रानभाज्यांचे प्रकार उपलब्ध होते. हा ठेवा आपणास जपायचा आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात या रानभाज्यांच्या पाककृती यू-ट्यूबसारख्या माध्यमांद्वारे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी यावेळी केले.