नाशिककरांनो, आता सातच्या आत घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:18 AM2021-03-09T04:18:06+5:302021-03-09T04:18:06+5:30
नाशिक : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना सायंकाळी ७ वाजेनंतर बंद ...
नाशिक : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना सायंकाळी ७ वाजेनंतर बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सकाळी ७ ते सायंकाळी ७ या कालावधीत दुकाने, धार्मिक स्थळे खुली राहतील, मात्र गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. बुधवारी (दि.१०) सकाळपासून याबाबतचे निर्बंध आदेश लागू होतील. त्यामुळे आता नाशिकरांना सायंकाळी ७ वाजेपर्यंत आपले दैनंदिन कामकाज करावे लागणार आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने तातडीने उपायोजना करण्यासाठी सोमवारी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अर्थचक्र सुरू राहील, मात्र गर्दीमुळे फैलावणाऱ्या कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या. त्यानुसार जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्ह्यासाठी काही निर्बंध जाहीर केले आहेत. जिल्ह्यातील सर्व आस्थापना सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुली राहणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सायंकाळी सातनंतर इतर दुकाने बंद ठेवण्यात येतील. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस बंद ठेवली जाणार आहेत. तेदेखील बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शासनाच्या पुढील आदेशापपर्यंत नाशिक, नांदगाव, निफाड आणि मालेगाव येथील शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत.
मार्च महिन्यात कोरेाना रुग्ण संख्येचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपायोजना केल्या जात आहेत. केंद्राच्या तज्ज्ञ समितीने काढलेल्या निष्कर्षानुसार गर्दीमुळे रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे गर्दीवर नियंत्रण आणण्यास काही निर्बंध लागू करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व आस्थापना, धार्मिक स्थळे, लग्नसोहळे यावर निर्बंध येणार आहेत. राजकीय, सामाजिक कार्यक्रमांनादेखील गर्दी जमवता येणार नाही. सार्वजनिक कार्यक्रम अत्यंत खासगी स्वरूपात करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
--इन्फो--
दुकानांची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ७
अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यातील सर्व प्रकारची दुकाने ही सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेतच सुरू राहतील. मेडिकल, हॉस्पिटल्स, दुग्ध व्यवसाय, भाजीपाला, वृत्तपत्र वितरण आदी अत्यावश्यक सेवा यातून वगळण्यात आलेल्या आहेत.
--इन्फो--
शाळा, महाविद्यालये राहाणार बंद
नाशिक महापालिकेने शाळा १५ तारखेपपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले असले तरी आता शहरातील सर्व शाळा, खासगी क्लासेस, महाविद्यालये पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. नाशिक तालुक्यासह निफाड, मालेगाव, नांदगाव तालुक्यामंध्ये रुग्ण आढळून आल्याने तेथील शाळा बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबतचे स्वतंत्र आदेश काढले जाणार आहेत. दहावी आणि बारावीचे वर्ग मात्र सुरू राहतील. मात्र त्यासाठी पालकांची संमती आवश्यक असेल.
--इन्फो--
नियोजित परीक्षा नियमानुसारच होतील
जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यात आले असले तरी तत्पूर्वी जाहीर झालेल्या स्पर्धा तसेच इतर विभागांच्या परीक्षा या वेळापत्रकानुसारच होतील. परीक्षेच्या ठिकाणी कोरोना नियमांचे पूर्णपणे पालन करण्याचे बंधन मात्र राहणार आहे.
--इन्फेा;--
आठवडे बाजार पूर्णपणे बंद
शहर, जिल्ह्यात भरणारे आठवडे बाजार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. बाजारात येणाऱ्यांची गर्दी लक्षात घेता आठवडे बाजार बंद करण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
--इन्फो--
लग्नसोहळ्यांना निर्बंध
केंद्राच्या समितीने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार लग्नसोहळ्यांमधील गर्दीमुळे कोरोनाचा फैलाव झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता लग्नसोहळ्यांवर निर्बंध येणार आहे. येत्या १५ तारखेपर्यंत नियोजित लग्नसोहळे होतील, मात्र कमी लेाकांच्या उपस्थितीत. १५ तारखेनंतर मात्र लग्नासाठी कुणालाही गर्दी जमविता येणार नाही. खासगी जागेत, मोजक्या नातेवाइकांच्या उपस्थितीत मात्र ते लग्न पार पाडू शकणार आहेत.
--इन्फो--
भाजीबाजार ५० टक्के क्षमतेने
दैनंदिन भाजी बाजारात होणारी गर्दी पाहता आता बाजारात ५० टक्के गर्दी होईल, अशा पद्धतीने नियोजन केले जाणार आहे. बाजार ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. विक्रेत्यांमध्ये अंतर ठेवण्यात येणार आहे.
--इन्पो-
जीम, व्यायामशाळांमध्ये कोणत्याही स्पर्धा घेता येणार नाही. त्यांना तेथे एकाच वेळी गर्दी करता ोयेणार नाही. वैयक्तिक स्वरूपातील व्यायामांना कोणतेही बंधन राहणार नाही. नियमित सरावासाठी व्यायामशाळा सुरू राहतील.