नाशिककरांनी पुन्हा घडवले स्वयंशिस्तीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:14 AM2021-03-21T04:14:29+5:302021-03-21T04:14:29+5:30

नाशिक : कोरोनाच्या संकटामुळे नाशिककरांना पुन्हा एकदा निर्बंधांना सामोरे जावे लागत असून व्यापारी आणि व्यावसायिकांना त्याचा फटका बसत आहे. ...

Nashik residents re-created the philosophy of self-discipline | नाशिककरांनी पुन्हा घडवले स्वयंशिस्तीचे दर्शन

नाशिककरांनी पुन्हा घडवले स्वयंशिस्तीचे दर्शन

Next

नाशिक : कोरोनाच्या संकटामुळे नाशिककरांना पुन्हा एकदा निर्बंधांना सामोरे जावे लागत असून व्यापारी आणि व्यावसायिकांना त्याचा फटका बसत आहे. अशा परिस्थितीतही जिल्हा प्रशासनाने कोरोना नियंत्रणासाठी शनिवारी व रविवारी दुकाने बंद ठेवण्याच्या केलेल्या आवाहनाला नाशिककरांकडून स्वयंशिस्तीचे दर्शन घडवत उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रशासनाला सहकार्याची भूमिका घेतल्याचे दिसून आले.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बाजारपेठेतील गर्दी ही धोक्याची वर्दी मानली जात असल्याने पुन्हा एकदा निर्बंध लागू करणे जिल्हा प्रशासनाला भाग पडले असले तरी आता यापुढे लॉकडाऊनची वेळ येऊ द्यायची नसेल तर सर्वांनीच स्वयंशिस्तीने आरोग्य नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, अशा भावना नाशिकमधील मान्यवर व्यापारी प्रतिनिधींनी व्यक्त केल्या. नाशिकमध्ये बाधितांची संख्या वाढू लागल्याने सोमवार ते शुक्रवार दुकाने आणि बाजारपेठा सायंकाळी ७ वाजपेर्यंत सुरू ठेवण्याची मर्यादा असून शनिवार-रविवारी तर सर्वच दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचा व्यापाऱ्यांच्या आणि बाजारपेठेतील अर्थकारणाबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनादेखील फटका बसत आहे. परंतु, कोरोना वाढू नये यासाठी नाशिकमधील व्यापाऱ्यांनी सलग दुसऱ्या आठवड्यात स्वयंशिस्तीचे दर्शन घडवत दुकाने बंद ठेवून कोरोनाविरोधातील लढ्यात सहभाग घेतला आहे. त्याचप्रमाणे बाजारपेठा सुरू असल्यावरही स्वयंशिस्त पाळली पाहिजे तरच कोरोनाचा पराभव होईल, असे मतही व्यावसायिकांनी व्यक्त केले.

शालीमार, मेन रोड, दहीपूल परिसरात शुकशुकाट

शहरातील शालीमार, मेन रोड, दहीपूल, सराफ बाजार, रविवार कारंजा परिसरात सोमवार ते शुक्रवार विविध प्रकारची दुकाने सुरू राहत असल्याने ग्राहकांचीही वर्दळ दिसून येते. मात्र शनिवारी व रविवारी जिल्हा प्रशासनाने दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले असल्याने गेल्या आठवड्याप्रमाणेच या आठवड्यातही बाजारपेठेत बंद पाळण्यात आल्याने परिसरात शुकशुकाट दिसून आला.

शहरातील रस्त्यावरची वर्दळही घटली

शहरातील विविध दुकाने व बाजारपेठांसह उपनगरांमध्येही बाजारपेठा बंद राहिल्याने शनिवारी दिवसभर शहरातील रस्त्यांवरची वर्दळही घटल्याचे दिसून आले. त्यामुळे शहरासह उपनगरांमध्येही वेगवेगळ्या रस्त्यांवर शुकशुकाट होता.

Web Title: Nashik residents re-created the philosophy of self-discipline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.