रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी नाशिककर उतरले रस्त्यावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:14 AM2021-04-11T04:14:05+5:302021-04-11T04:14:05+5:30

नाशिक : गत चार दिवसांपासून शहरामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनची प्रचंड टंचाई जाणवत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांचा बांध फुटला. त्यांनी ...

Nashik residents take to the streets for Remedesivir injection! | रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी नाशिककर उतरले रस्त्यावर !

रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी नाशिककर उतरले रस्त्यावर !

Next

नाशिक : गत चार दिवसांपासून शहरामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनची प्रचंड टंचाई जाणवत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांचा बांध फुटला. त्यांनी शहरातील महात्मा गांधी रोडवर ठिय्या आंदोलन सुरू केले; मात्र तिथे आंदोलनाची दखल घेणारे कुणीच नसल्याने आंदोलनकर्त्यांनी सातपूरच्या अन्न-औषध प्रशासन कार्यालयावर धडक दिली. अखेर अन्न-औषध प्रशासन कार्यालयात आंदोलनकर्त्यांसह खासदार भारती पवारदेखील धडकल्यावर तेथील अधिकाऱ्यांनी तुमचे रुग्ण ज्या हॉस्पिटलला ॲडमिट असतील, तिथे रविवारी इंजेक्शन मिळेल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्ते मागे हटले.

नाशिक शहरात कोरोना बधितांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहे; परंतु रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्याने गेल्या चार ते पाच दिवसांपासून रुग्ण वणवण भटकत आहेत. जिल्हा प्रशासनाने रुग्णालयात इंजेक्शन पुरवण्याचे नियोजन करण्याचे आश्वासन दोन दिवसांपासून दिले असले तरी प्रत्यक्षात अनेक रुग्णालये आणि डॉक्टर रुग्णांना इंजेक्शन आणण्यासाठी पाठवत आहेत. संबंधित रुग्णालयांमध्ये इंजेक्शन नसल्याने गंभीर रुग्णांना तातडीने रेमडेसिवीर द्यायचे असल्यास रुग्णाच्या कुटुंबीयांनाच ते आणून द्यावे लागेल, असेही रुग्णालयांकडून सांगितले जाते. त्यामुळे महानगरातील ज्या दुकानांमध्ये रेमडेसिवीर उपलब्ध आहे, त्या मेडिकल दुकानांसमोर सकाळपासून रात्री उशिरापर्यंत रांगा लागत आहेत. अन्न आणि औषध प्रशासनाने दिलेले हेल्पलाइन नंबरही कोणी उचलत नाहीत, तसेच अनेक दुकानांमध्ये रेमडेसिवीर उपलब्ध नसल्याचे फलकदेखील झळकल्याने अखेर संतप्त नागरिकांनी शनिवारी सकाळीच गाेळे कॉलनीबाहेरील मेहेर चौकात अचानक आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला. आंदोलनकर्त्या नागरिकांमुळे काही काळ त्या चौकातील ट्रॅफीक जाम झाले होते. पोलिसांनी गर्दीला रस्त्यावरून मागे हटवल्यानंतरही नागरिक घोषणा देत आंदोलन करीत होते; मात्र त्या आंदोलनाची दखल घेणारे कुणीच जबाबदार अधिकारी नसल्याने अखेर आंदोलकांनी सातपूरच्या अन्न-औषध प्रशासनाच्या कार्यालयावर धडक दिली. तिथे आंदोलकांसमवेत खासदार भारती पवार यांनीदेखील जिल्हा औषध प्रशासनाला जाब विचारला. त्यानंतर नवनियुक्त अन्न आणि औषध प्रशासन सहआयुक्त डी. एम. भामरे यांनी सर्व आंदोलनकर्त्या नागरिकांची भेट घेतली, तसेच त्यांच्या कुटुंबातील रुग्णांची नावे आणि ॲडमीट केलेल्या हॉस्पिटल्सची नावे लिहून घेतल्यानंतर रविवारपर्यंत सर्व संबंधित हॉस्पिटलपर्यंत रेमडेसिवीरचे डोस पोहोचवण्याची व्यवस्था करण्याचे आश्यासन दिले. त्यानंतरच आंदोलक तेथून माघारी फिरले. दरम्यान, पालकमंत्री छगन भुजबळ हे शनिवारी नाशिकमध्ये असून, त्यांनी तरी यात लक्ष घालून तोडगा काढावा, अशी मागणीदेखील आंदोलनकर्त्या नागरिकांनी केली.

-----

मी दोन दिवसांपासून सकाळी ६ वाजता निघून नाशिकला रेमडेसिवीर घेण्यासाठी मेडिकलसमोर रांगेत उभा रहात होतो; मात्र तरी मला औषध मिळत नव्हते. तिकडे पेशंट औषध नाही म्हणून तर मी औषध मिळवण्यासाठी रांगेत उभा राहून मेलो असतो. म्हणूनच आमच्यासारख्या सामान्य नागरिकांना आंदोलन करावे लागले.

अतुल पडोळ, आंदोलक.

--------

फोटो

नीलेश तांबे

Web Title: Nashik residents take to the streets for Remedesivir injection!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.