नाशिककरांनो, तुमच्या घरात घातक ई वेस्ट आहे का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:17 AM2021-09-05T04:17:52+5:302021-09-05T04:17:52+5:30
नाशिक : घरात पडून असलेले आणि वापरात नसलेले मोबाइल, चार्जर, लॅपटॉप आणि अन्य साहित्य म्हणजेच ई कचरा! रेडिएशनमुळे तो ...
नाशिक : घरात पडून असलेले आणि वापरात नसलेले मोबाइल, चार्जर, लॅपटॉप आणि अन्य साहित्य म्हणजेच ई कचरा! रेडिएशनमुळे तो घातक असतो. त्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार हा घातक कचरा आता नष्ट करावा लागणार आहे. खरे तर संबंधित दुकानदारांनीच असा ई कचरा घेतला पाहिजे. मात्र, त्यापुढे जाऊन नाशिक महापालिकाही असा ई वेस्ट नष्ट करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. लवकरच अशा प्रकराचा ई कचरा संकलनासाठी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. नागरिकांनीही असा घातक कचरा घरात ठेवू नये असे आवाहन करण्यात येणार आहे.
सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने घरगुती कचऱ्यात भाजीपाल्याची साले आणि अन्य ओला आणि खोके वगैरे सारखा सुका कचरा असे दोनच वर्गीकरण होते. त्यातही घरातील सर्वच टाकाऊ साहित्य सुका कचरा म्हणून घंटागाडीतच देतात. फुटक्या कपबशीपासून इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्सचा टाकाऊ कचरादेखील घंटागाडीतच दिला जातो. अगदी घरातील संपलेल्या औषधांच्या बाटल्या, आउटडेटेड औषधी हा जैविक कचरादेखील त्यातच असतो. सध्या केवळ रुग्णालयातील जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावली जात असली तरी आता इलेक्ट्राॅनिक्स कचऱ्याचीदेखील शास्त्रोक्त निर्गत करण्यात येेणार आहे. नाशिक महापालिकेने त्यासाठी तयारी केली असून, एका कंपनीने निर्गत करण्याचा तसा प्रस्तावदेखील सादर केला आहे. त्याअंतर्गत महापालिकेच्या वतीने सहाही विभागात ई- कचरा कलेक्शन सेंटर्स उभारण्यात येणार असून, हा कचरा संबंधित ठेकेदार स्वखर्चाने दिंडोरी येथील प्रकल्पात नेऊन त्याची निर्गत करण्यात येणार आहे.
मुळात आपल्या घरात अशा प्रकारचा काही ई कचरा असतो हेच अनेकांना ज्ञात नाही. बिघडलेले मोबाइल चार्जर घरातच असते, तसेच हेडफोनदेखील पडून असतो. जुने टीव्ही तर ठिक; परंतु आता स्मार्ट टीव्ही देखील असतो. मात्र, हा कचरा वेगळा असतो असे अनेकांना ज्ञात नाही. मात्र, कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्याची गरज असते, असे नाशिकमधील तज्ज्ञ अभियंता प्रा. सुनील कुटे सांगतात. ई वेस्ट हा देशात मोठ्या प्रमाणात असतो आणि त्यातील रिसायकल म्हणजेच पुनर्उत्पादन होऊ शकेल असे पार्ट वगळता अन्य कचरा हा अनेक कंपन्या जमिनीत किंवा समुद्रात डम्प करतात किंवा फेकतात. अशा कचऱ्याचे रेडिएशन समुद्रातील जैविक साखळीलादेखील घातक असतात. अनेक प्रकारचा कचरा विल्हेवाट लावण्यासाठी शासन प्रयत्न करीत असेल तर गैर नाही, नागरिकांत त्याबद्दल जागृती झाली पाहिजे, असेही प्रा कुटे म्हणाले.
कोट...
घरात मोबाइल किंवा अन्य साधने सक्रिय असताना धोका असतोच, बंद पडल्यानंतर त्यातून फार धोका असतो असे नाही. मात्र, ई कचऱ्याची विल्हेवाट येाग्य पद्धतीने लावली पाहिजे. ॲट सोर्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक दुकानदारांनी तो परत घेऊन कंपन्यांनी सामाजिक दायित्व निधीअंतर्गत त्याची विल्हेवाट लावली पाहिजे.
प्रा. सुनील कुटे
कोट...
नाशिक महापलिकेच्या वतीने घातक ई कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्याची तयारी करण्यात आली आहे. महासभेत यासंदर्भात प्रस्ताव मांडण्यात आला आहे. ई कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावतानाच पर्यावरण संवर्धन हा त्यामागील उद्देश आहे.
- शिवकुमार वंजारी, पर्यावरण अधिकारी, महापालिका
इन्फो....
या कचऱ्यात सापडते सोने...
इलेक्ट्रॉनिक्सचा कचरा टाकावू असला तरी त्यातून अनेक कंपन्यांना वेगळेच सोने सापडते. काही पार्टस् तयार करताना सोन्याचा वर्ख किंवा प्लॅटिनम वापरले जाते, हे दोन्ही मौल्यवान धातू आहेत. त्याचे प्रमाण खूप नगण्य असले तरी सोने आणि त्याही पेक्षा प्लॅटिनमला अधिक भाव आहे. त्यामुळे अनेक कंपन्या ई वेस्ट क्षेत्रात काम करतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.