"टोईंग"चा नाशिककरांना बसणार "दणका"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:14 AM2021-05-23T04:14:16+5:302021-05-23T04:14:16+5:30

नाशिक : शहरात कोठेही अधिकृत पार्किंग उपलब्ध नाही, यामुळे सर्वत्र अनधिकृतपणे वाहने उभी करावी लागतात. परिणामी वाहतूक कोंडी होते. ...

Nashik residents will be hit by 'towing' | "टोईंग"चा नाशिककरांना बसणार "दणका"

"टोईंग"चा नाशिककरांना बसणार "दणका"

Next

नाशिक : शहरात कोठेही अधिकृत पार्किंग उपलब्ध नाही, यामुळे सर्वत्र अनधिकृतपणे वाहने उभी करावी लागतात. परिणामी वाहतूक कोंडी होते. दोन वर्षांपूर्वी वादग्रस्त ठरलेली पोलिसांची खासगी ठेकेदारामार्फत वाहने उचलण्याची मोहीम आता पुन्हा नव्याने सुरू करण्याच्या हालचालींना गती आली आहे. वाहने टोईंग करण्याचा ठेकादेखील आयुक्तालयाकडून एका खासगी कंपनीला देण्यात आला आहे.

शहरात बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्याच्या उदात्त हेतूने तीन महिन्यासाठी पुन्हा ‘टोईंग’ कारवाई पहिल्या टप्प्यात येत्या 15 दिवसात शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून सुरू केली जाणार आहे. यासाठी एका खासगी ठेकेदाराचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, आयुक्तालयाकडून येत्या १५ दिवसात टोईंगच्या कारवाईबाबत हरकती मागविण्यात आल्या आहेत. यंदा टोईंग कारवाईत ज्या कोणाची दुचाकी सापडली त्या दुचाकी मालकाला २९०, तसेच तीनचाकी वाहनचालकाला २०१ आणि चारचाकी चालकाला थेट ५५० रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे.

एकीकडे नाशिक स्मार्ट होत असल्याचे सांगितले जात असून दुसरीकडे नाशकात अधिकृत वाहनतळ शहराच्या महत्वाच्या मध्यवर्ती भागात अद्याप उपलब्ध करुन देण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिकांना नाईलाजाने विविध रस्त्यांच्याकडेला वाहने उभी करावी लागतात. आशा स्थितीत पोलीस प्रशासनाकडून टोईंग मोहीम राबविण्यात येत असल्याने पुन्हा एकदा नाशिककरांच्या रोषाचा सामना पोलीस प्रशासनाला करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

2019साली टोईंग कारवाई चांगलीच वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. टोईंग व्हॅनवरील कर्मचाऱ्यांचे अरेरावीचे वर्तन, नियमबाह्य कारवाई, आर्थिक गैरव्यवहार, असभ्य वागणे, वाहनांचे होणारे नुकसान असे एक ना अनेक कारणांमुळे टोईंग नाशकातून शहर पोलिसांना हद्दपार करावी लागली होती. ऑक्टोबर २०१९ ला टोईंग कारवाई पूर्णपणे बंद करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा वाहतूक पोलिसांनी टोईंग कारवाई सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कायदेशीर बाबींची पूर्तता करुन शहर वाहतूक पोलिसांनी टोईंगचा ठेका दिला आहे.

नागरिकांनी शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त यांच्या नावे पोलीस आयुक्त कार्यालय, तळ मजला येथे लेखी हरकती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Nashik residents will be hit by 'towing'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.