नाशिककरांना मिळणार निर्बंधातून दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:15 AM2021-07-30T04:15:56+5:302021-07-30T04:15:56+5:30
नाशिक काेरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी असलेल्या जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्याबाबतचा सकारात्मक निर्णय मुख्यमंत्र्यांच्या टास्क फोर्सने घेतला असल्याने नाशिक जिल्ह्याला ...
नाशिक
काेरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी असलेल्या जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्याबाबतचा सकारात्मक निर्णय मुख्यमंत्र्यांच्या टास्क फोर्सने घेतला असल्याने नाशिक जिल्ह्याला दिलासा मिळण्याची दाट शक्यता आहे. नाशिक जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट जवळपास एक टक्का इतकाच असल्याने निर्बंध शिथिलतेचा लाभ जिल्ह्याला मिळू शकतो. दरम्यान, या संदर्भात शुक्रवारी (दि.३०) पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या आढावा बैठकीत शिथिलतेबाबतचा निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात लागू असलेल्या निर्बंधातून काही प्रमाणात शिथिलता मिळावी, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाला पाठविला होता. जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला असल्याने, शनिवार किंवा रविवार यापैकी एक दिवस दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळावी किंवा दुकानांची वेळ एक तासाने वाढवून तरी मिळावी, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाच्या टास्क फोर्सकडे पाठविला होता.
गुरुवारी मुंबईत झालेल्या बैठकीत याबाबत सकारात्मक निर्णय झाल्याने नाशिकसह २५ जिल्ह्यांमधील निर्बंधांत शिथिलता मिळण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. नाशिक जिल्हा तिसऱ्या टप्प्यात असल्याने सध्या जिल्ह्यात वीकेण्ड लॉकडाऊन सुरू असून शनिवार आणि रविवार असे दोन दिवस दुकाने बंद ठेवली जात आहे. तर, वेळेच्या निर्बंधामुळे दुकाने सायंकाळी ४ वाजेपर्यंतच सुरू ठेवली जात आहेत. यात आता दिलासा मिळू शकतो. शासनाने निर्बंध शिथिलता देण्याचे निश्चित केल्यामुळे दुकानांची वेळ सायंकाळी ७ वाजेपर्यंत होण्याची शक्यता आहे. शिवाय, वीकेण्ड लॉकडाऊनमधील शनिवारी दुकाने सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी मिळण्याची दाट शक्यता आहे. रविवारी मात्र दुकाने बंद ठेवली जाऊ शकतात.
शॉपिंग सेंटर्स, मॉल्स, सिनेमागृहे, जिम सध्या बंद असल्याने त्यांना ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी मिळणार असल्याचे संकेत आहेत.
--इन्फो--
१) जिल्ह्यात निर्बंध लागू झाल्यानंतर सुरुवातीला सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच दुकाने उघडण्यास परवानगी होती. जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर दुकानांची वेळ सायंकाळी ४ वाजेपर्यंत करण्यात आली होती. ही वेळ आणखी कमी करण्याची मागणी व्यापारीवर्गाकडून सातत्याने केली जात आहे.
२) इतर सर्व दुकाने सुरू असताना मॉल्स बंद असल्याने मॉल्सला परवानगी मिळावी, अशी मागणी सातत्याने संचालकांकडून केली जात होती. त्यानुसार ५० टक्के क्षमतेने मॉल्स सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू झाल्याने अवघ्या सहाच दिवसांत मॉल्सची परवानगी पुन्हा काढून घेण्यात आली. नव्या नियमांत मॉल्सला पुन्हा ५० टक्के क्षमतेने परवानगी मिळू शकते.
३) गेल्या ४ जुलैनंतर वीकेण्डमध्ये लग्न समारंभांना परवानगी नाकारण्यात आलेली आहे. त्यांना नव्या निर्णयाचा लाभ मिळू शकतो. किमान शनिवारी लॉन्स, मंगल कार्यालयांमधील लग्न सोहळे होण्याची शक्यता आहे.
--कोट--
अद्याप आदेश प्राप्त नाहीत
जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्याने निर्बंधांत शिथिलता मिळावी, असा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविण्यात आलेला आहे. शिथिलता देण्याबाबत जिल्ह्याला अद्याप कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाहीत.
-- सुरज मांढरे, जिल्हाधिकारी
--इन्फो--
क्लासेस, शाळांना प्रतीक्षा
आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले असले तरी क्लासेसला मात्र परवानगी देण्यात आलेली नाही. त्यांना यातून दिलासा मिळण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा उघडण्याबाबत अद्यापही निर्णय नसल्याने त्यांनाही प्रतीक्षा करावी लागणार आहे.
-----
सध्या रेस्टॉरंटला असलेले निर्बंध काही प्रमाणात शिथिल होण्याची दाट शक्यता आहे. रात्री दहा वाजेपर्यंत त्यांना परवानगी मिळण्याची शक्यता आहे.
---