नाशिककरांना आता रशियन ‘स्पुतनिक’ लस मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:16 AM2021-05-25T04:16:53+5:302021-05-25T04:16:53+5:30
नाशिक- शहरात लसीकरणासाठी नागरिक तयार असताना कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे डोसच उपलब्ध होत नसल्याने अखेरीस महापालिकेने लस स्वत: खरेदी करून ...
नाशिक- शहरात लसीकरणासाठी नागरिक तयार असताना कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे डोसच उपलब्ध होत नसल्याने अखेरीस महापालिकेने लस स्वत: खरेदी करून नागरिकांना उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यानुसार पाच लाख रशियन ‘स्पुतनिक’ लस खरेदीवर आयुक्त कैलास जाधव यांनी शिक्कामोर्तब केले आहे. मुंबई महापालिकेच्या निविदेत आलेल्या दरानुसार पाच लाख लस खरेदी करण्यात येणार असून, सोमवारी (दि.२४) तसे पत्र आयुक्त कैलास जाधव यांनी वितरकाला दिले आहे. त्यामुळे नाशिककरांना आता रशियन लस मिळणार आहे.
नाशिक शहरात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू झाल्यानंतर आधी काेरोना योद्धे, त्यानंतर फ्रंटलाइन वर्कर्सला देण्यात आली. सामान्य नागरिक त्यावेळी अपेक्षित प्रतिसाद देत नव्हते. मार्च आणि एप्रिलमध्ये आलेल्या काेरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मात्र भीतीचे वातावरण पसरले. त्यामुळे नागरिक लस घेण्यास तयार असताना दुसरीकडे मात्र लसींचा पुरवठा कमी कमी होत गेला. त्यातच १ मे पासून १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झाल्यानंतर तर कोणालाच लस नाही असा प्रकार सुरू झाला. त्यामुळे महापौर सतीश कुलकर्णी यांनी गटनेत्यांची बैठक घेऊन लस खरेदी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, लस खरेदीसाठी ग्लोबल निविदा मागविल्या तरी त्यास होणारा विलंब लक्षात घेता ज्या महापालिकांनी अगोदरच लस खरेदीसाठी निविदा मागविल्या होत्या त्या मुंबई, पुणे आणि ठाणे महापालिकांशी चर्चा करून त्यांना होणाऱ्या पुरवठ्यातूनच महापालिकेनेदेखील खरेदी करण्यासाठी चाचपणी करण्याचे ठरविण्यात आले. आयुक्त कैलास जाधव यांनी मुंबई महापालिकेशी संपर्क साधला असता त्यांच्याकडे रशियाच्या स्पुतनिक लसीसाठी एकाने पुरवठ्याची तयारी केली आहे. मात्र, आणखी लस मिळाव्यात यासाठी निविदेला मुदतवाढ देण्याचे ठरविण्यात आले होते.
दरम्यान, नाशिक महापालिकेने स्पुतनिक लस खरेदीसाठी स्वारस्य दाखविल्याने मुंबई महापालिकेत निविदा भरणाऱ्या पुरवठादार तथा वितरकाने सोमवारी (दि.२४) महापालिका आयुक्त कैलास जाधव यांची भेट घेतली. त्यांनी साधारणत: दोन हजार रुपये दर सांगितला असून, महापालिकेने अशा दरातदेखील लस घेण्याची तयारी दर्शविली आहे. मुंबई महापालिकेला पुरवठा केल्यानंतर त्यांच्याकडून ही लस महापालिकेला मिळणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेला पुरवठ्यानुसार लसींची रक्कम अदा करण्यात येईल. मात्र, मुंबई महापालिकेला दिलेल्या दरानुसारच लस खरेदी करण्याची तयारी असल्याचे पत्र सोमवारी (दि.२४) पुरवठादारास दिल्याचे आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले.
इन्फो...
केवळ एकाच डोसमध्ये काम फत्ते
सध्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लसींचे दोन डोस ठराविक दिवसांच्या अंतराने घ्यावे लागतात. मात्र, स्पुतनिक लसीचा केवळ एकच डोस पुरेसा आहेे. म्हणजे दोन वेळा लसीकरण केंद्रांवर जाण्याची गरज नाही, असे आयुक्त कैलास जाधव यांनी स्पष्ट केले. या लसीचे दोन डाेस किंवा एक डोस असे दोन प्रकार आहेत. मात्र, एका डोसमध्येच लसीकरण पूर्ण आणि प्रतिकारशक्ती वाढेल अशी सुमारे दोन हजार रुपयांना एक असा डोस खरेदी करण्यात येणार आहे.
इन्फो..
खासगी रुग्णालयांनाही देणार
रशियन लसीचे खासगी रुग्णालयांनादेखील वितरण करण्यात येणार आहे. महापालिकेने ज्या दराने खरेदी केले, त्यापेक्षा शंभर रुपये अधिक शुल्क आकारून ही लस नागरिकांना देण्याची मुभा देण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले. सध्याची स्थिती बघता नागरिकांची शुल्क मोजूनदेखील लस खरेदीची तयारी आहे. त्यामुळे ज्यांची शुल्क मोजायची तयारी आहे, असे नागरिक खासगी रुग्णालयातून शुल्क मोजून लस खरेदी करू शकतील.