नाशिकरोड : रेल परिषदेच्या पाठपुराव्याला यश ‘पंचवटी’ला मिळणार २१ बोगींचा रॅक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 01:00 AM2018-02-04T01:00:37+5:302018-02-04T01:10:48+5:30
नाशिकरोड : रेल परिषदने पंचवटी एक्स्प्रेसला नवीन २१ बोगींचा रॅक मिळावा याकरिता केलेल्या पाठपुराव्यामुळे महिन्याभरात पंचवटी एक्स्प्रेसला नवीन २१ बोगींचा रॅक उपलब्ध होईल.
नाशिकरोड : रेल परिषदने पंचवटी एक्स्प्रेसला नवीन २१ बोगींचा रॅक मिळावा याकरिता केलेल्या पाठपुराव्यामुळे महिन्याभरात पंचवटी एक्स्प्रेसला नवीन २१ बोगींचा रॅक उपलब्ध होईल, अशी माहिती रेल परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी व गुरूमितसिंग रावल यांनी दिली.
नाशिककर रेल्वे प्रवाशांच्या दृष्टीने मुंबई-ठाणे येथे दररोज ये-जा करण्यासाठी पंचवटी एक्स्प्रेस ही अत्यंत महत्त्वपूर्ण गाडी ठरली आहे. पंचवटी एक्स्प्रेसच्या पासधारक बोगीची लिम्का बुक आॅफ रेकॉर्डमध्ये आदर्श कोच म्हणून नोंद सुद्धा झाली आहे. रेल परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी व गुरूमितसिंग रावल यांनी नुकतीच चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीत जाऊन पंचवटीच्या नवीन २१ बोगींची पाहणी केली. यावेळी इंटिग्रल कोच फॅक्टरीचे मुख्य मॅकेनिकल इंजिनिअर एल.सी. त्रिवेदी यांना नवीन २१ बोगींची आंतर्बाह्य रचना व कार्य हे आदर्श असावे, बैठक व्यवस्था, आरामदायक असावी, सर्व आसनाशेजारी मोबाइल चार्जिंग पॉइंट असावे, सर्व कोचना बायोटॉयलेट असावे, दरवाजे आपोआप बंद व्हावेत, कोचच्या छताचा, सौर ऊर्जेसाठी वापर व्हावा, वैद्यकीय प्रथमोपचार पेटी असावी, अशा विविध सूचना केल्या. पंचवटी एक्स्प्रेसच्या सर्व २१ बोगींचा नवीन रॅक द्यावा याकरिता रेल्वे परिषदेच्या वतीने रेल्वेमंत्री, मुंबई रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक, रेल्वे बोर्डाकडे सतत पाठपुरावा केला होता. पंचवटीच्या नवीन २१ बोगींची इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई येथे बांधणी जवळपास पूर्णत्वाकडे आली आहे.