नाशिकरोडला ‘उत्सव’ संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 12:46 AM2019-08-27T00:46:12+5:302019-08-27T00:46:37+5:30
नाशिकरोडच्या सीमारेषांवर असलेली खेडी, मोठ्या प्रमाणातील कामगार वर्ग, पारंपरिक सण सोहळे साजरे करण्याची परंपरा आणि आठवडे बाजार तसेच यात्रांमुळे ग्रामीण अर्थचक्र अवलंबून असलेले नाशिकरोड कोणे एकेकाळी मोठी बाजारपेठ होती.
नाशिकरोड : नाशिकरोडच्या सीमारेषांवर असलेली खेडी, मोठ्या प्रमाणातील कामगार वर्ग, पारंपरिक सण सोहळे साजरे करण्याची परंपरा आणि आठवडे बाजार तसेच यात्रांमुळे ग्रामीण अर्थचक्र अवलंबून असलेले नाशिकरोड कोणे एकेकाळी मोठी बाजारपेठ होती. त्यामुळेच येथील गणेशोत्सवदेखील तितका भव्य आणि नागरिकांना आकर्षित करणारा होता. परंतु गेल्या काही वर्षांपासून या उत्सवाची भव्यता कमी झाली असून, बोटावर मोजण्याइतपतच मंडळांच्या बळावर गणेशोत्सवाची परंपरा टिकून आहे.
अनेकविध कारणांमुळे उत्सवातील भव्यता कमी झाली असून, लोकसहभागही कमी झाला आहे. सामाजिक, आर्थिक आणि प्रशासकीय कारणेदेखील यामागे असल्याचे सांगितले जात असले तरी परंपरागत सण-उत्सवासाठी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेणारे कार्यकर्ते, नेतेच नसल्याने नाशिकरोडचा सांस्कृतिक वारसा कमी होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. एकीकडे इंदिरानगरसारख्या भागात सांस्कृतिक चळवळ रुजत असताना जवळच्या नाशिकरोडमधून मात्र उत्सवाचे महत्त्वच कमी झाल्याचे चित्र आहे.
नाशिकरोड परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव जवळपास हद्दपार झाल्यासारखाच आहे. बोटावर मोजण्याइतपत पाच ते सात मंडळांनी ही परंपरा कशीबशी टिकवून धरली आहे. अंतर्गत राजकारण, नियम आणि कायद्याचा अडसर, पोलिसांची दंडुकेशाही घटलेली वर्गणी, आर्थिक अडचणी, लोकांचा कमी झालेला सहभाग या सर्वांचा परिणाम या उत्सवावर दिसून येत आहे.
साधारणपणे दोन दशकांपूर्वी नाशिकरोड परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सवाची एक वेगळी ओळख होती. मंडळांमध्ये भव्यतेची स्पर्धा होती. धुमधडाक्यात उत्सव साजरा केला जात होता. गणेशोत्सवाची संख्या मोठी होती. परंतु कालांतराने या उत्सवाला घरघर लागली. अनेक विविध घटनांमुळे मंडळांची संख्या कमी होत गेली.
उत्सवाला सार्वजनिक स्वरूप यावे
सार्वजनिक उत्सवातून कमी होणारे कार्यकर्ते, नेत्यांचे झालेले दुर्लक्ष, पोलीस प्रशासनाचे नियम, महागडे देखावे, या कारणांमुळे उत्सवाला अधिकच उतरती कळा आली आहे. लोकांचा सहभाग आणि सार्वजनिक हितासाठी नेते, कार्यकर्त्यांनी उत्सव अधिक लोकाभिमुख केला तर सर्वसामान्यांचाही सहभाग वाढू शकतो.
कार्यकर्त्यांचा राजकारणातील सक्रिय सहभाग वाढत गेला आणि सामाजिक सण उत्सवाची नाळ तुटत गेली. राजकारण आणि स्वहिताला महत्त्व प्राप्त झाल्याने सार्वजनिक मंडळे हळूहळू कमी झाली. ज्यांची इच्छा आहे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. निवडणुकीचा ज्वर वाढला तर उत्सवाला बहर येतो. इतरवेळी मात्र कुणीही मदतीला पुढे येत नसल्याचा अनुभव जुन्या कार्यकर्त्यांना येत आहे.