रेल्वेच्या देवस्थान विकासात नाशिकरोडचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 08:29 PM2020-02-03T20:29:18+5:302020-02-03T20:29:24+5:30
देशातील धार्मिक स्थळांना दरवर्षी लाखो भाविक रेल्वेने प्रवास करून भेटी देत असतात, त्यातून रेल्वेला मोठे उत्पन्नही मिळते. त्यामुळे भाविकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने रेल्वेच्या नऊ विभागात महत्वाची धार्मिक स्थळे असलेल्या १५ रेल्वे स्थानकांचा विकास
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिकरोड : देशातील महत्वाची धार्मिक स्थळे असलेल्या ठिकाणाच्या रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण करण्याबाबत रेल्वे मंत्रालयाने पावले उचलली असून, त्यासाठी देशातील १५ रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यात नाशिकचे धार्मिक महत्व लक्षात घेता, मध्य रेल्वेच्या विभागातील नाशिकरोड रेल्वे स्थानकाचा समावेश करण्यात आला आहे.
देशातील धार्मिक स्थळांना दरवर्षी लाखो भाविक रेल्वेने प्रवास करून भेटी देत असतात, त्यातून रेल्वेला मोठे उत्पन्नही मिळते. त्यामुळे भाविकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने रेल्वेच्या नऊ विभागात महत्वाची धार्मिक स्थळे असलेल्या १५ रेल्वे स्थानकांचा विकास आणि आधुनिकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील महत्त्वाची धार्मिक स्थळे असलेल्या चित्रकुटधाम, गुहावटी, कांचीपुरम, रामेश्वरम, श्रीसैलम, तिरुपती, व्दारका, उज्जैन, गया, पुरी, काशी, प्रयाग, हरिव्दार, ऋषीकेश व मध्य रेल्वे विभागातील एकमेव नाशिकरोड अशा रेल्वे स्थानकांचा त्यात समावेश आहे. याबाबत तातडीने सर्वे करुन अहवाल पाठविण्याचे आदेश रेल्वे मंत्रालयाने दिले आहेत. याकरिता नाशिकरोड रेल्वे स्थानकाचे अधीक्षक आर. के. कुठार, मुख्य वाणिज्य निरीक्षक कुंदन महापात्रा, वर्क्स विभागाचे वरिष्ठ अभियंता सुभाषचंद्र शर्मा, इलेक्ट्रिकल विभागाचे वरिष्ठ अभियंता प्रवीण पाटील या चार जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. नाशिक हे धार्मिक स्थळ असून तसेच दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो, त्याच बरोबर बारा ज्योर्तिलिंगापैकी एक त्र्यंबकेश्वर येथे असल्याने याठिकाणीही बाराही महिने भाविक दर्शनासाठी येत असतात. याशिवाय नाशिकरोडहूनच शिर्डी दर्शनासाठीही भाविक रेल्वेने ये-जा करीत असतात. त्यामुळे मध्य रेल्वेच्या विभागातील एकमेव नाशिक रोड रेल्वे स्थानकाची या आधुनिकीकरणासाठी निवड करण्यात आली आहे.