मंगळवारपासून नाशिकरोडची बाजारपेठ चार दिवसांसाठी बंद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 07:45 PM2020-06-21T19:45:48+5:302020-06-21T19:47:54+5:30
एकमताने मंगळवारपासून शुक्रवारपर्यंत चार दिवस नाशिकरोड परिसरात कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. बंद काळात नागरिकांनी देखील घरातच राहून कोरोना साखळी तोडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन
नाशिक : शहर व परिसरासह नाशिकरोड, जेलरोड, देवळालीगाव या भागातसुध्दा कोरोनाचे संक्रमण वाढू लागल्यामुळे आता शहरापाठोपाठ नाशिकरोड येथील व्यापाऱ्यांनीसुध्दा येत्या मंगळवारपासून (दि.२३) नाशिकरोडची बाजारपेठदेखील कडकडीतपणे चार दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय सर्वपक्षीय पदाधिकारी व व्यापारीवर्गाच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
ंमागील काही दिवसांमध्ये शहराच्या विविध भागांमध्ये कोरोना रु ग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी रविवारी सकाळी जेलरोड येथे नगरसेवक दिनकर आढाव यांच्या निवासस्थानी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, व्यापारी, मनपा व पोलिस अधिकारी यांची संयुक्त बैठक पार पडली. बैठकीत अनेकांनी बंदबाबत विविध सूचना व आपले मत मांडले. बैठकीमध्ये औषधाची दुकाने, दूध विक्र ी केंद्र व इतर अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळण्याबाबत चर्चा करण्यात आली. मात्र त्यांनी देखील सायंकाळी पाच वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवावी असे सांगण्यात आले. एकमताने मंगळवारपासून शुक्रवारपर्यंत चार दिवस नाशिकरोड परिसरात कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. बंद काळात नागरिकांनी देखील घरातच राहून कोरोना साखळी तोडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यता आले आहे. अत्यावश्यक गटात मोडणा-या किराणा, मेडिकल, भाजी बाजार बंद ठेवण्यास दुकानदारांनी संमती दिली. मात्र वाईनशॉप दुकानदारांनी बंदला नकार दर्शविला असल्याची माहिती नगरसेवक रमेश धोंगडे यांनी दिली. त्यामुळे ही दुकाने बंद राहणार की नाही, याबाबत अद्याप सांशकता आहे.
बैठकीला संभाजी मोरु स्कर, सूर्यकांत लवटे, प्रशांत दिवे, राजेंद्र ताजने, नाशिकरोड मनपा विभागीय अधिकारी महेंद्र पगारे, व्यापारी राजन दलवानी, विजय चोरिडया, सुरेश शेटे, राम साधवाणी, सुनील बेदमुथा, नाना नगरकर, नेमीचंद कोचर, राजुशेठ दुसाने, सुनील महाले, सुनील आडके, हेमंत गायकवाड, भैया बाहेती, युनुस सय्यद आदी उपस्थित होते.