नाशिकरोडला पावसाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 01:13 AM2019-07-02T01:13:27+5:302019-07-02T01:13:43+5:30
नाशिकरोडसह परिसरात कोसळलेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पाण्याचे तळे साचले होते. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने वाहनांना मार्गक्रमण करणेही कठीण झाले होते.
नाशिकरोड : नाशिकरोडसह परिसरात कोसळलेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पाण्याचे तळे साचले होते. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने वाहनांना मार्गक्रमण करणेही कठीण झाले होते. अनेक ठिकाणी दुकाने आणि घरांमध्ये पाणी शिरले तर देवळालीगावातील आठवडे बाजारही पावसामुळे प्रभावीत झाला. सुमारे तीन ते चार तास कोसळलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले.
मेनगेट, विभागीय आयुक्त कार्यालय, गायकवाड मळा, सुभाषरोड, पवारवाडी, देवळालीगाव राजवाडा, दत्तमंदिररोड, विकास मतिमंद मुलांची शाळा, दत्तमंदिररोड, गायखे कॉलनी रस्ता, जेलरोड पवारवाडी, जुना सायखेडारोड, सिन्नरफाटा, शिखरेवाडी, नेहरूनगर आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने तळ्यासारखी परिस्थिती झाली होती.
शिखरेवाडी अमर सोसायटी, नीलांबरी सोसायटी, जेलरोड जुना सायखेडारोड, पारिजातनगर, जेलरोड, पवारवाडी, ढिकलेनगर सरस्वती कॉलनी, लोखंडे मळा, रुक्मिणीनगर आदी भागातील रहिवाशांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते. जयभवानीरोड येथील उघडा नाला हा पाण्याने तुडुंब भरून वाहत असल्याने खोले मळ्यातील नाल्यालगतच्या काही रहिवाशांच्या घरांमध्ये पाणी शिरले होते.
तीन-चार तास झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. रस्त्यांवरील विक्रेते, हातगाडीवरील विक्रेते यांना व्यवसाय बंद करण्याची पाळी आली होती. सायंकाळी ७ वाजेनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत होते.
वाहने झाली नादुरुस्त
रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने तेथून जाणाऱ्या दुचाकी, रिक्षा यांच्या मशीनमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने वाहने बंद पडली होती. अनेक ठिकाणी दुचाकी व रिक्षाचालक बंद पडलेली वाहने धक्का मारत घेऊन जाताना दिसत होते. शासकीय-निमशासकीय कार्यालय सायंकाळी ६ वाजता सुटल्यानंतर पावसामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना ताटकळत थांबावे लागले.
नाले-गटारी सफाई ठरला फार्स
४मनपा प्रशासनाकडून पावसाळ्यापूर्वी गटारी, नाल्यांची सफाई मोहीम हाती घेण्यात आली होती. तसेच रस्त्यामधील भूमिगत गटारीच्या चेंबरचे झाकण अनेक दगड, माती, प्लॅस्टिक, केरकचरा यामुळे बुजून गेले आहेत. यामुळे रस्त्यावरील पावसाचे पाणी अनेक ठिकाणी भूमिगत गटारीत जाऊ शकत नसल्यामुळे ठिकठिकाणी पावसाचे तळे साचले होते. भूमिगत गटारीच्या चेंबरची झाकणे मोकळी व स्वच्छ करणे गरजेचे आहे.
आठवडे बाजारात गोंधळ
देवळाली गावातील सोमवारच्या आठवडे बाजारात विक्रेते, शेतकरी, भाजीपाला आदी वस्तू विक्री करण्यासाठी दुपारी तीनपर्यंत दाखल झाले होते. नेहमीप्रमाणे आठवडे बाजार विक्रेत्यांनी फुलून गेला
होता. मात्र त्यानंतर तब्बल तीन तास मुसळधार पाऊस झाल्याने विक्रेते, शेतकरी यांची धावपळ झाली. शेतकरी सायंकाळी आपला माल तसाच सोडून निराश होत निघून गेले होते.