नाशिकरोड प्रभाग : क्रीडांगण, आरोग्य प्रश्नांकडे दुर्लक्ष; नगरसेवकांचा आरोप अतिक्रमणाच्या प्रश्नावर अधिकारी धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 12:15 AM2017-12-01T00:15:13+5:302017-12-01T00:24:53+5:30
परिसरात वाढत चाललेले अतिक्रमण, मनपाच्या क्रीडांगणावरील असुविधा व बंद पथदीप आदी प्रश्नांवरून नाशिकरोड प्रभाग समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी प्रशासनावर प्रश्नांचा भडिमार करत धारेवर धरले.
नाशिकरोड : परिसरात वाढत चाललेले अतिक्रमण, मनपाच्या क्रीडांगणावरील असुविधा व बंद पथदीप आदी प्रश्नांवरून नाशिकरोड प्रभाग समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी प्रशासनावर प्रश्नांचा भडिमार करत धारेवर धरले.
नाशिकरोड प्रभाग समितीची बैठक प्रभाग सभापती अनिता सातभाई यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दुपारी पार पडली. यावेळी नगरसेविका संगीता गायकवाड यांनी गायकवाड मळा, मुक्तिधाम परिसरातील अनधिकृत अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत असून, मनपा अधिकाºयांना वारंवार लेखी आणि तोंडी सांगूनही उपयोग होत नाही. अतिक्रमणधारक आणि मनपा अतिक्रमण विभागाचे अधिकारी यांच्यामध्ये आर्थिक साटेलोटे असल्याने हे अतिक्रमण काढण्यात येत नाही, असा आरोप गायकवाड यांनी केला. जेलरोड, सिन्नर फाटा परिसरात अतिक्रमण वाढले आहे. नाशिकरोड मनपा विभागीय कार्यालयाशेजारीच पदपथवर अधिकारी व नगरसेवकांच्या नाकावर टिच्चून फळविक्रेत्यांनी अतिक्रमण केले असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. नगरसेवक सत्यभामा गाडेकर यांनी, देवळाली गावातील आठवडे बाजारात अतिक्रमण विभागाचे कर्मचारी भाजीपाला विक्रेत्या शेतकºयांवर दादागिरी करीत असल्याने त्याच्यांवर अन्याय होत आहे. तसेच काही स्थानिक टवाळखोर या शेतकºयांकडून बाजार फी म्हणून खंडणी उकळीत असल्याने मनपाने पोलिसांच्या माध्यमातून भाजीपाला विक्रेत्यांना संरक्षण द्यावे, अशी सूचना गाडेकर यांना केली. तसेच आर्टिलरी सेंटर रोडवर पथदीप बंद पडलेले आहेत. जैन मंदिरासमोरील मनपाच्या मैदानाची स्वच्छतेअभावी दुरवस्था झाली असून, याबाबत संबंधित अधिकाºयांना सांगूनदेखील दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नगरसेविका ज्योती खोले यांनी केला. नगरसेविका सरोज अहिरे यांनी वडनेर दुमाला येथे डेंग्यूमुळे नागरिकांना प्राण गमवावा लागत असल्याने त्या भागातील वालदेवी नदीची स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी केली. बैठकीला नगरसेविका सुनीता कोठुळे, मीरा हांडगे, जयश्री खर्जुल, कोमल मेहरोलिया, संभाजी मोरूस्कर, रमेश धोंगडे, सूर्यकांत लवटे, प्रशांत दिवे, संतोष साळवे, पंडित आवारे, अंबादास पगारे, दिनकर आढाव, शरद मोरे, विशाल संगमनेरे, केशव पोरजे आदींसह अधिकारी उपस्थित होते.