गुंडगिरीमुळे नाशिकरोडला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर
By admin | Published: January 22, 2017 12:08 AM2017-01-22T00:08:04+5:302017-01-22T00:08:22+5:30
पोलीस हतबल : भाईगिरीचे प्राबल्य; दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीती
नाशिकरोड : नाशिकरोड परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेली गुंडगिरी, टोळीगिरीचे कंबरडे मोडण्यात पोलीस प्रशासनाला यश येत नसल्यामुळे सर्वसामान्य रहिवासी हतबल झाले आहेत़ त्यातच शेजवळ खून प्रकरणामुळे तर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर होत चालल्याचे निदर्शनास आले असून, आगामी महापालिका निवडणुका भयमुक्त होणार का? अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे़ जेलरोड परिसराचा गेल्या काही वर्षांत ज्या झपाट्याने विकास झाला त्याचप्रमाणे या भागात गुंडगिरी, भाईगिरी, टोळीगिरीचे प्राबल्य वाढले आहे. राजकीय पक्षांनी गुंडापुंडांना आश्रय दिल्याने व मारामाऱ्या, हाणामाऱ्या झाल्या की राजकीय हस्तक्षेप वाढल्याने भाईगिरीमध्ये वाढ झाली आहे. गल्लीबोळांत, चौकाचौकांत युवकांचे टोळके उभे राहत असून, ‘भाई’च्या क्रेझमुळे १४-१५ वयोगटानंतरची मुले याकडे आकृष्ट होण्याचे प्रमाण वाढले आहे. केक कापावा याप्रमाणे जेलरोडचा परिसर प्रत्येक भाईचा एरिया म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. पूर्वी पोलिसांना बघितले तरी सर्व काही ठिकाणावर येत होते. मात्र विविध कारणांमुळे खाकीचा वचक कमी झाल्याने गुंडगिरीने चांगलेच तोंड वरती आले आहे. दोन-अडीच वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, उपायुक्त डी़ एस़ स्वामी, हेमराजसिंह राजपुत या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कायद्याचा धाक निर्माण करत सगळेच वठणीवर आणले होते.