नाशिकरोड-सिन्नर फाटा आठवडे बाजार गजबजला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:09 AM2018-03-26T00:09:39+5:302018-03-26T00:20:15+5:30
सिन्नर फाटा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवारातील शनिवारच्या आठवडे बाजाराला शेतकरी, व्यापारी व ग्राहकांचा प्रतिसाद लाभल्याने बाजार गजबजू लागला आहे.
नाशिकरोड : सिन्नर फाटा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवारातील शनिवारच्या आठवडे बाजाराला शेतकरी, व्यापारी व ग्राहकांचा प्रतिसाद लाभल्याने बाजार गजबजू लागला आहे. सिन्नर फाटा उपबाजार आवारात सहा महिन्यांपूर्वी शनिवार आठवडे बाजार सुरू करण्यात आला. प्रारंभी एक-दोन महिने आठवडे बाजाराला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, बाजार समितीच्या संचालक, अधिकारी,कर्मचारी यांनी परिसराती गावात व इतर आठवडे बाजारात शेतकरी, विक्रेते यांच्याशी संपर्क साधून सिन्नर फाटा येथील शनिवार आठवडे बाजाराची माहिती दिली, तर ग्रामीण भागात याबाबत घरोघरी माहितीपत्रके वाटण्यात आली. त्यामुळे सिन्नर फाटा उपबाजार आवारातील शनिवारचा आठवडे बाजार फुलून गेला आहे. विक्रेत्यांनी कुठे बसावे यांचे व्यवस्थित नियोजन केल्याने इतर विविध वस्तू विक्रेतेदेखील आठवडे बाजारात येऊ लागले आहेत. बाजार समितीने स्वच्छतागृह व पाण्याची सोय करावी, अशी मागणी शेतकरी व विक्रेत्यांकडून केली जात आहे.
दररोज बाजार सुरू होणार
सिन्नर फाटा येथील शनिवार आठवडे बाजाराला अल्पकाळात मोठा प्रतिसाद लाभला आहे. शेतकरी व विक्रेत्यांची दररोजचा बाजार सुरू करावा, अशी मागणी होत आहे. नाशिकरोड उड्डाणपुलाखालील भाजी मार्केट उठविणार असल्याने तेथील विक्रेत्यांची गैरसोय होऊ नये म्हणून सिन्नर फाटा उपबाजारात दररोजचा बाजार सुरू करण्याचा मानस आहे. - प्रवीण नागरे, संचालक, बाजार समिती, नाशिक