नाशिक रोडला सलग तिसऱ्या दिवशी पावसाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:14 AM2021-05-01T04:14:45+5:302021-05-01T04:14:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक रोड : परिसराला सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पावसाने झोडपले. पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक रोड : परिसराला सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पावसाने झोडपले. पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांना वाढत्या तापमानापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, पावसामुळे अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाल्याने सर्वत्र अंधार पसरला होता. नाशिक रोड शुक्रवारी (दि.३०) रात्री ८ वाजेच्या सुमारास सलग तिसऱ्या दिवशीही जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. गेल्या तीन दिवसांपासून नाशिक रोडच्या काही भागांत गारांसह पावसाचे आगमन झाले असून, गुरुवारीही जोरदार पाऊस झाला. सलग तिसऱ्या दिवशीही पावसाचा जोर वाढल्याने नागरिकांची धावपळ उडाली. आकाशात सायंकाळपासूनच ढग दाटून आल्याने पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. ६ वाजेच्या सुमारास जोरदार वारे वाहण्यास सुरुवात होऊन ७.३० वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. काही भागांत पावसाचा जोर जास्त असल्याने रस्त्यावरील वाहतूकही पावसामुळे मंदावली होती.
इन्फो-
कोरोना रुग्णांचे नातेवाईक चिंतेत
ऐन उन्हाळ्यात आलेल्या अवेळी पावसामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कोरोनाचे संकट असतानाच पाऊस आल्याने धास्तीचे वातावरण आहे. ज्यांनी घरातच कोरोनाबाधित रुग्णास ऑक्सिजन मशीन लावले आहे, त्या भागातील विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे रुग्ण व त्यांचे नातेवाईक चिंतेत पडले होते.