नाशिक - पिस्तुलाचा धाक दाखवून विद्यार्थ्यांना लुटले
By admin | Published: June 24, 2016 10:10 AM2016-06-24T10:10:15+5:302016-06-24T10:10:15+5:30
चहा पिण्यासाठी जाणा-या दोघा भावंडांना रस्त्यात अडवून पिस्तुलाचा धाक दाखवून जबरीने रिक्षात बसवून सहा हजार रूपयांची रोकड व दोन मोबाईल लुटण्यात आले
Next
>ऑनलाइन लोकमत -
रोकड, मोबाइल लंपास : अमृतधाम येथील घटना
नाशिक, दि. 24 - चहा पिण्यासाठी जाणा-या दोघा भावंडांना रस्त्यात अडवून पिस्तुलाचा धाक दाखवून जबरीने रिक्षात बसवून सहा हजार रूपयांची रोकड व दोन मोबाईल लुटून नेल्याची घटना काल गुरूवारी सायंकाळी अमृतधाम वरदविनायक मंदिर रस्त्यावर घडली आहे. भरवस्तीत घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली असुन ज्या विद्यार्थ्यांना लुटले ते विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी श्रीराम शेटे यांची नातवंडे आहेत.
याबाबत आशितोष शेटे याने दिलेल्या तक्रारीनुसार पंचवटी पोलिसात लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशितोष व त्याचा चुलत भाऊ शाहू शेटे असे दोघे क का वाघ कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत असुन ते सध्या हिरावाडीतील अयोध्यानगरी येथे राहतात. गुरूवारी सायंकाळी साडेसहा वाजता आशितोष, शाहू व त्यांचा मित्र केतन रकिबे असे तिघेजण चहा पिण्यासाठी अमृतधामला जात असतांना पाठीमागून आलेल्या रिक्षातून एकजण उतरला व तुम्ही काल राहूल, विजय यांच्या बरोबर होते का असे विचारून माझ्याकडे पिस्तुल आहे तुम्ही रिक्षात बसा नाहीतर ठोकून टाकेल असा दम दिला. पिस्तुलाचा धाक दाखविल्याने तिघेही रिक्षात बसले नंतर संशयिताने रकिबेच्या खिशात सहा हजाराची रोकड असलेले पॉकिट काढून घेत त्याला सिगारेट आणण्यासाठी खाली उतरवून रिक्षा पाट रस्त्याने पेठरोड रोहीणीनगरला नेत पैशांची मागणी केली परंतु पैसे नाही असे सांगताच संशयिताने दोन मोबाइल जबरीने हिसकावून रिक्षातून पळ काढला त्यानंतर घाबरलेल्या दोघा भावंडांनी घडल्या प्रकराची माहिती नातेवाईकांना देत पंचवटी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे.
घटनेची पुनरावृत्ती
काही दिवसांपूर्वीच जुना आडगाव नाक्यावरून अशाच प्रकारे एका विद्यार्थ्याला धाक दाखवून रिक्षात बसवून नेत लुटले होते. ज्या विद्यार्थ्याला लुटले तो शिर्डी येथे कार्यरत असलेल्या पोलिस अधिकाऱ्याचा मुलगा होता. सदरच्या घटनेला काही दिवस लोटत नाही तोच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी असलेल्या शेटे यांच्या नातवंडांना लुटल्याने संशयितांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांसमोर आव्हान ठाकले आहे.