नाशिक ग्रामीण पोलिसांकडून अटक: प्रियकर व भावाच्या मदतीने पतीचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 10:57 PM2018-04-05T22:57:59+5:302018-04-05T22:57:59+5:30
ओझर गावातील समतानगर भागात राहणाऱ्या निर्मला ऊर्फ ज्योती चंपालाल जाट या संशयित महिलेने पती चंपालाल जाट यांचा प्रियकर रमेश साहेबराव सोनवणे व भाऊ कैलास भिला पुणेकर (रा. जेलरोड) यांच्या मदतीने मंगळवारी (दि.३) काटा काढला.
नाशिक : प्रियकर व भावाच्या मदतीने पतीचा खून केल्याची घटना निफाड तालुक्यातील बोकडदरे शिवारात घडली होती. औरंगाबाद-नाशिक महामार्गावर एका पुरुष जातीचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला. या गुन्ह्यात ग्रामीण पोलिसांनी पत्नीसह संशयित प्रियकर व तिच्या भावाला अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ओझर गावातील समतानगर भागात राहणाऱ्या निर्मला ऊर्फ ज्योती चंपालाल जाट या संशयित महिलेने पती चंपालाल जाट यांचा प्रियकर रमेश साहेबराव सोनवणे व भाऊ कैलास भिला पुणेकर (रा. जेलरोड) यांच्या मदतीने मंगळवारी (दि.३) काटा काढला. चंपालाल यांना नातेवाइकांकडे जायचे आहे, असे सांगून त्यांची मारुती ओम्नी मोटारीतून (एम.एच.१५, बीडब्ल्यू ५८६६) मनमाडकडे घेऊन गेले. तेथून पुन्हा नाशिकच्या दिशेने येताना मध्यरात्रीच्या सुमारास सोनवणे व पुणेकर यांनी मिळून चंपालाल यांच्यावर धारदार शस्त्राने वार करत अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. वर्मी घाव लागल्याने चंपालाल यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे प्रेत अर्धवट जळालेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आले होते. या गंभीर गुन्ह्याच्या तपासचक्रे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी गुन्हे शाखेच्या पथकाला वेगाने फिरविण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक अशोक करपे यांनी गोपनीय बातमीदाराकडून माहिती घेऊन ओझर येथून संशयित सोनवणे याच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर त्याचा साथीदार गांगुर्र्डे व संजय कारभारी बाविस्कर यांनाही गुन्ह्यात सहभाग असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतले.