नाशिकमध्ये तापमान 6 अंश, तर निफाडचा पारा 2.4 अंशांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 09:51 AM2020-01-17T09:51:37+5:302020-01-17T09:56:44+5:30
जिल्ह्यात काल म्हणजे गुरुवारपेक्षा पारा घसरला असून, 6 अंश सेल्सिअस असे नीचांकी तापमान नोंदविले गेले आहे,
नाशिक- जिल्ह्यात काल म्हणजे गुरुवारपेक्षा पारा घसरला असून, 6 अंश सेल्सिअस असे नीचांकी तापमान नोंदविले गेले आहे, तर निफाडचा 2.4 असे तापमान असल्याने तेथे दवबिंदूंऐवजी बर्फ झाल्याचे दिसत आहे. या वर्षीची सर्वाधिक थंडीचा अनुभव काल गुरुवारी ( 16) नाशिककरांना आला होता. काल नाशिकमध्ये 9.2 अंशांवर होते. मात्र, आज त्यापेक्षा कमी 6 अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.
नाशिक आणि निफाडचे तापमान खाली येऊ लागले अन् सायंकाळी गाव, वाडी, वस्तीवर शेकोट्या पेटू लागल्या आहेत. निफाडमध्ये अवघा तालुका थंडीने गारठला आहे. आज सकाळी कुंडेवाडी गहू संशोधन केंद्रावर 2.4 अंश तापमानाची नोंद झाली आहे. तापमानात अचानक घट झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाले असून , द्राक्ष वेलींना तडे जाणे, पाने सुकणे, मुळ्या चोकप होणे, असे प्रकार वाढणार आहे. त्यामुळे यापासून द्राक्ष बागा वाचविण्यासाठी शेतकरी भल्या पहाटे बागेत चिपाटे पेटवून उष्णता तयार करीत आहे. मात्र हीच वाढती थंडी गहू, कांदा, हरबरा पिकासाठी पोषक ठरू लागली आहे.