नाशिकमध्ये स्थायी समितीच्या सदस्य निवडीवरून राडा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 03:25 PM2020-02-24T15:25:37+5:302020-02-24T15:26:12+5:30
महापालिकेच्या स्थायी समितीच्या आठ सदस्य निवडीवरून भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षात राडा झाला
नाशिक- महापालिकेच्या स्थायी समितीच्या आठ सदस्य निवडीवरून भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षात राडा झाला. भाजपाकडून उमेदवारी न मिळाल्याने नगरसेविका प्रियांका घाटे यांच्या समर्थकांनी गोंधळ घालत पक्षाकडे राजीनामा दिला तर शिवसेनेत पूनम मोगरे यांना संधी न मिळाल्याने त्यांच्याही सदस्यांनी गोंधळ घातला.
स्थायी समितीचे आठ सदस्य 29 फेब्रुवारीस निवृत्त होत असून त्यांच्या जागी 8 नवे सदस्य नियुक्त करण्यासाठी विशेष महासभा आज महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली खाली झाली. यावेळी भाजपाकडून हेमंत शेट्टी, सुप्रिया खोडे, वर्षा भालेराव, शिवसेनेकडून सत्यभामा गाडेकर आणि सुधाकर बडगुजर तर काँग्रेसकडून राहुल दिवे तसेच राष्ट्रवादीकडून समीना मेमन यांच्या नावांची घोषणा केली. उमेदवारी न मिळाल्याने प्रियंका घाटे यांचे बंधू रोशन घाटे यांनी सभागृहाबाहेर गोंधळ घातला आणि विशिष्ट समाजाला डावलले जात असल्याचा आरोप केला या गोंधळामुळे महापौर सतीश कुलकर्णी यांनी सदस्य नियुक्त केले आणि तात्काळ सभा संपविली. यानंतर घाटे समर्थक रामायण या महापौर निवासस्थानी ठाण मांडून बसले आहेत.
दरम्यान, शिवसेनेने पक्षीय तौलनिक संख्या बळ लक्षात घेऊन तीन सदस्यांची नावे घोषित करण्यासाठी महापौर कुलकर्णी यांच्या कडे दिली होती परंतु तीन पैकी ज्योती खोले यांचे नाव जाहीर न केल्याने शिवसेनेने नाराजी व्यक्त केली.