नाशिकचा पर्यटन हब म्हणून विकास व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:11 AM2021-06-17T04:11:37+5:302021-06-17T04:11:37+5:30

नाशिक : शहराचा विकास होत असतानाच येथे पर्यटनासाठी उपलब्ध असणाऱ्या सुविधांची माहिती अधिकाधिक व्यक्तींपर्यंत पोहोचवून नाशिकचा पर्यटन हब म्हणून ...

Nashik should be developed as a tourism hub | नाशिकचा पर्यटन हब म्हणून विकास व्हावा

नाशिकचा पर्यटन हब म्हणून विकास व्हावा

googlenewsNext

नाशिक : शहराचा विकास होत असतानाच येथे पर्यटनासाठी उपलब्ध असणाऱ्या सुविधांची माहिती अधिकाधिक व्यक्तींपर्यंत पोहोचवून नाशिकचा पर्यटन हब म्हणून विकास होणे गरजेचे असल्याचे मत शहरातील विविध विकासकांनी व्यक्त केले आहे.

नाशिक ‘लोकमत’च्या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनाच्या निमित्ताने बिल्डर्स आणि विकासकांशी साधण्यात आलेल्या संवादामध्ये वरील अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावेळी क्रेडाई, नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन, ठक्कर्स डेव्हलपर्सचे जितुभाई ठक्कर, सुयोजित इन्फ्रास्ट्रक्चरचे चेअरमन अनंत राजेगावकर, रोहन एंटरप्रायजेसचे संचालक अविनाश शिरोडे, सम्राट ग्रुपचे संचालक सुजॉय गुप्ता, जयकुमार कन्स्ट्रक्शनचे चेअरमन मनोज टिबरेवाला, जय डेव्हलपर्सचे संचालक वासुदेव ललवाणी, बागड प्रॉपर्टीजचे संचालक सुशील बागड, एबीएच डेव्हलपर्सचे संचालक निशीत अटल, आदित्य बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्सचे संचालक अनंत ठाकरे यांनी आपली मते व्यक्त केली. ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी व सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक यांनी चर्चेत भाग घेतला.

नाशिकचे नाव हे आजही एक धार्मिक क्षेत्र म्हणूनच आहे. मात्र, गेल्या दोन दशकांमध्ये येथे झालेला विकास हा अन्य शहरांतील नागरिकांना कळविला पाहिजे. त्याचप्रमाणे नाशिक पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित होण्याची गरज आहे. यामुळे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा येऊ शकेल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

नाशिकमध्ये उपलब्ध असलेल्या शैक्षणिक, तसेच आरोग्यविषयक सुविधांमुळे नाशिकमध्ये घर घेण्यासाठीचा कल वाढत आहे. नाशिकमधून अन्य शहरांमध्ये, तसेच परदेशामध्ये गेलेल्यांनाही या निमित्ताने नाशिकमध्ये गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित केले जाऊ शकेल. सध्या बांधकाम क्षेत्रामध्ये असलेल्या मंदीमुळे गुंतवणुकीची उत्तम संधी नागरिकांना असल्याचे मतही व्यक्त झाले. नाशिकमधील चांगले वातावरण, मुबलक पाणी, चांगली हवा, वाहतुकीच्या सुविधा यामुळे अन्य शहरांमधून येथे राहण्यास येणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे निरीक्षणही यावेळी नोंदविले गेले. सूरत-चेन्नई महामार्गामुळे सूरतहून नाशिकमध्ये येणे आणखी सुकर होणार असल्याने सुरत- नाशिक असा औद्योगिक पट्टा तयार झाल्यास रोजगाराची उपलब्धता वाढू शकते, ही बाबही अधोरेखित करण्यात आली.

इन्फो

ग्राहक तक्रार निवारण व्यवस्था

नाशिक शहरातील विकासकांची ग्राहक तक्रार निवारण व्यवस्था ही रेरा येण्याच्या आधीपासूनच अस्तित्वात असून, त्यामुळे येथील गृहबांधणी क्षेत्रामध्ये फसवणुकीचे प्रकार फारसे होत नसल्याचे जितुभाई ठक्कर यांनी स्पष्ट केले. रेरा कायद्याने आता ग्राहकांनाही संरक्षण मिळाले आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. या कायद्यामध्ये आणखी काही बदल करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

इन्फो

लसीकरणाची मोहीम

क्रेडाई नाशिक मेट्रोने आपल्या सभासद आणि कुटुंबीयांसाठी कोविड लसीकरणाची मोहीम राबविणे सुरू केले असून, त्याला चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे रवी महाजन यांनी सांगितले. याशिवाय बांधकाम क्षेत्रामध्ये काम करीत असलेल्या ८५०० कामगारांसाठीही लवकरच लसीकरणाची मोहीम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय क्रेडाईने वृक्षारोपणाच्या मोहिमेतही सक्रिय सहभाग नोंदविल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

इन्फो

स्वतंत्र बिझनेस स्पेसचाही विचार व्हावा

कोरोनामुळे आता वर्क फ्रॉम होम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मात्र, घर आणि ऑफिस या दोन्ही गोष्टी एकत्र असल्यास योग्य ते काम होत नाही. ही बाब लक्षात घेऊन आगामी प्रकल्पांमध्येच स्वतंत्र बिझनेस स्पेस ठेवण्याचा विचार व्हावा, अशी सूचनाही मांडण्यात आली. यामुळे त्या प्रकल्पातील रहिवासी या ठिकाणी येऊन आपले काम करू शकतील. घराच्या जवळ पण कामाची वेगळी जागा असल्याने काम अधिक शिस्तबद्ध होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. वर्क फ्रॉम होमसाठी इंटरनेटची अधिक चांगली सुविधा, तसेच अन्य पायाभूत सुविधा उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे मतही या व्यावसायिकांनी व्यक्त केले.

Web Title: Nashik should be developed as a tourism hub

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.