नाशिकला सहा मेट्रोसिटींची विमानसेवा सुरू होणार २१ डिसेंबरला घोषणा : उडानच्या दुसºया टप्प्यात समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 01:30 AM2017-12-02T01:30:43+5:302017-12-02T01:32:03+5:30
देशातील महत्त्वांच्या शहरांना हवाई मार्गाने जोडण्याच्या पहिल्या टप्प्यात निराशा पदरी पडलेल्या नाशिकसाठी उडान योजनेचा दुसरा टप्पा महत्त्वाचा ठरला आहे.
नाशिक : देशातील महत्त्वांच्या शहरांना हवाई मार्गाने जोडण्याच्या पहिल्या टप्प्यात निराशा पदरी पडलेल्या नाशिकसाठी उडान योजनेचा दुसरा टप्पा महत्त्वाचा ठरला आहे. रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम (रेस)च्या दुसºया टप्प्यात नाशिकमधून हैदराबाद, बंगळुरू, गोवा, भोपाळ, अहमदाबाद व दिल्ली या शहरांसाठी विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, पहिल्या टप्प्यात उडान योजनेतून नाशिकमधून अन्य शहरांसाठी विमानसेवा सुरू न झाल्याने नाशिकला उडान योजनेच्या दुसºया टप्प्यातून वगळू नये, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी लावून धरली होती. शिवाय नाशिक-मुंबई व नाशिक-पुणे विमानसेवा सुरू न झाल्याने संसदेसमोर शिवसेनेच्या वतीने आंदोेलन केले होते. उडान योजनेच्या दुसºया टप्प्यात नाशिकसह राज्यातील अन्य महत्त्वाच्या शहरांतून सुरू होणाºया या विमानसेवेची प्रत्यक्ष घोषणा २१ डिसेंबरला केंद्र सरकारकडून होणार असल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले. ४ ते २० डिसेंबरदरम्यान दुसºया टप्प्यातील उडान योजनेत सहभागी झालेल्या विमान कंपन्यांची बीड (तांत्रिक सहभाग व निविदा उघडण्याची) प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानंतर नाशिक-भोपाळ, नाशिक-दिल्ली, नाशिक-हैदराबाद, नाशिक-गोवा, नाशिक-अहमदाबाद, नाशिक-बंगळुरू या विमानसेवांसाठी कोणत्या विमान कंपन्या उत्सुक आहेत याची सविस्तर माहिती सादर केली जाणार आहे. यापूर्वी नाशिक-दिल्ली व नाशिक-बंगळुरू विमानसेवेचे सर्वेक्षण जाहीर झाले असून, नाशिक-दिल्लीसाठी स्पाईस जेट ही विमान कंपनी, तर नाशिक-बंगळुरूसाठी एअर अलायन्स ही विमान कंपनी उत्सुक असल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले. दुसºया टप्प्यात नाशिकपासून सहा प्रमुख मेट्रोंसाठी प्रादेशिक हवाई सेवा अर्थात उडान योजनेंतर्गत सहा शहरांसाठी विमानसेवा सुरू होणार असल्याचे पत्र खासदार हेमंत गोडसे यांना भारतीय हवाई प्राधिकरणाच्या सचिवांनी कळविले आहे.
नाशिक-मुंबईचा मुहूर्त टळणार १५ डिसेंबरपासून नाशिकहून मुंबई व पुणे येथे एअर डेक्कन विमान कंपनीने विमानसेवा सुरू करण्याचे जाहीर केले होते. मात्र, दक्षिण आफ्रिकेहून या कंपनीला विमान खरेदीसाठी २९ डिसेंबरला परवानगी मिळाली. त्यानंतर १९ सीटर असलेले विमान प्रत्यक्ष नाशिकला सर्व सोपस्कार पूर्ण होऊन पोहोचेपर्यंत ३१ डिसेंबर उजाडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही विमानसेवा १ जानेवारी २०१८ पासूनच सुरू होईल, असे दिसते.