शंभर एकर जागेत साकारणार अत्याधुनिक ‘नाशिक वेलनेस हब’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 07:20 PM2018-03-03T19:20:12+5:302018-03-03T19:20:12+5:30
नाशिक-इगतपुरी-त्र्यंबकेश्वर या भागातील निसर्गसौंदर्य व आल्हाददायक वातावरणाचा लाभ घेत त्या भागातील पर्यटनव्यवसायला ‘बुस्ट’ मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘नाशिक वेलनेस हब’चा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे.
नाशिक : आयुर्वेदापासून तर थेट ताणतणाव व्यवस्थापनासाठी ध्यानधारणेपर्यंत सर्व प्रकारच्या आरोग्य उपचारपध्दती एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून पर्यटन विकास महामंडळाच्या पुढाकाराने नाशिक-इगतपुरी-त्र्यंबकेश्वर या पर्यटनाच्या सुवर्णत्रिकोणामध्ये ‘नाशिक वेलनेस हब’ उभारले जाणार आहे. या वेलनेस हबसाठी इगतपुरी-त्र्यंबके श्वरच्या दरम्यान येत्या महिनाभरात जागा निश्चित केली जाणार आहे.
‘हेल्थ टुरिझम’ला चालना देण्यासाठी तसेच नाशिक-इगतपुरी-त्र्यंबकेश्वर या भागातील निसर्गसौंदर्य व आल्हाददायक वातावरणाचा लाभ घेत त्या भागातील पर्यटनव्यवसायला ‘बुस्ट’ मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘नाशिक वेलनेस हब’चा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे. येत्या २०२० पर्यंत वेलनेस हब साकारला जाणार असल्याचा विश्वास पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय सहसंचालक आशुतोष राठोड यांनी व्यक्त केला. राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या संकल्पनेतून आशियामधील सर्वाेत्तम सोयीसुविधा व उपचारपध्दतीच्या दृष्टीने व्यापक असे वेलनेस हब नाशिकमध्ये उभे राहणार आहे. यामुळे नाशिक जिल्ह्याच्या पर्यटनाचा सुवर्णत्रिकोण अधिक विकसित होण्यास मदत होणार आहे. हे वेलनेस हब मुंबईपासून जवळ असणार आहे. त्यामुळे मुंबईकरांसमवेत विदेशी पर्यटकांनाही वेलनेस हब आक र्षित करणारा ठरणार असल्याचे राठोड म्हणाले.
ताणतणावाचे व्यवस्थापन करत नैराश्यावर मात करता यावी, स्मरणशक्ती वृध्दिंगत व्हावी तसेच विविध आजारांवर आयुर्वेदिक, नॅचरोपॅथी, होमिओपॅथी, अॅक्युप्रेशर, अॅक्युपंक्चर, बॉडी मसाजसह ध्यानधारणा, योगा केंद्रासह विविध प्रकारच्या आरोग्याशी संबंधित सुविधा वेलनेस हबद्वारे पर्यटकांना एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. नाशिक जिल्ह्यात सुमारे शंभर एकर जागेवर उभे राहणारे वेलनेस हब हे भारतातील पहिले हब ठरणार आहे. कारण एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये वेलनेस हब अद्याप कुठेही अस्तित्वात नाही. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पी.पी.पी) तत्त्वावर हे हब साकारले जाणार आहे.
----
जागतिक दर्जाच्या सुविधा
पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारितीत पीपीपी तत्त्वानुसार विकसित केल्या जाणाºया ‘नाशिक वेलनेस हब’मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्याच्या दृष्टीने उपचार पध्दती व सुविधा पुरविल्या जाणार आहेत. वैद्यकशास्त्रानुसार उपचाराच्या आयुर्वेदापासून वॉटरथेरपीपर्यंत सर्वच पध्दतीचा लाभ नागरिकांना याद्वारे घेता येणार आहे. एकूणच या वेलनेस हबमुळे नाशिकच्या कृषी पर्यटन, निसर्ग पर्यटन, धरण पर्यटनासह धार्मिक पर्यटनाला अधिक चालना मिळण्यास मदत होईल. मुख्य म्हणजे पर्यटकांचा मुक्काम नाशिक जिल्ह्यात वाढीस लागेल.