नाशिक सुन्नी इज्तेमा : इस्लामने दिली महिलांना खरी सुरक्षा- मौलाना सय्यद अमीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 09:50 PM2018-02-03T21:50:49+5:302018-02-03T22:19:34+5:30
दुपारी दोन वाजेपासून मेळाव्याला शहरातील शहाजहांनी इदगाह मैदानावर प्रारंभ करण्यात आला. प्रारंभी पैगंबरांवर आधारित काव्य पठण (नात-ए-रसूल) करण्यात आले. यावेळी कादरी म्हणाले, फेसबुक, यु-ट्यूब, व्हॉट्स अॅप यांसारख्या सोशल मीडियापासून सतर्कता बाळगावी.
नाशिक : महिलांना आदर, सन्मानाची वागणूक देण्याचा आदेश चौदाशे वर्षांपूर्वी इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांनी अनुयायांना दिला. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी पैगंबरांनी त्यावेळी स्त्रीभ्रूण हत्येविरुद्ध समाजप्रबोधन करत नवजात मुलींना दफन करण्याची प्रथा बंद केली, असे प्रतिपादन सुन्नी दावत-ए-इस्लामीच्या वार्षिक धार्मिक मेळाव्याच्या अखेरच्या सत्रात केले.
सुन्नी दावत-ए-इस्लामी या धार्मिक संघटनेच्या नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने शहरात दोनदिवसीय चौदावा धार्मिक मेळावा (सुन्नी इज्तेमा) आयोजित करण्यात आला. मेळाव्याचा पहिला दिवस शनिवारी (दि.३) महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला होता. यावेळी मंचावर शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मौलाना शाकीर अली नुरी, मौलाना मुफ्ती निजामुद्दीन यांच्यासह स्थानिक धर्मगुरू, उलेमा मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुपारी दोन वाजेपासून मेळाव्याला शहरातील शहाजहांनी इदगाह मैदानावर प्रारंभ करण्यात आला. प्रारंभी पैगंबरांवर आधारित काव्य पठण (नात-ए-रसूल) करण्यात आले. यावेळी कादरी म्हणाले, फेसबुक, यु-ट्यूब, व्हॉट्स अॅप यांसारख्या सोशल मीडियापासून सतर्कता बाळगावी. कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार व गैरवापर सोशल मीडियाचा करू नये. धर्मग्रंथ कुराणच्या शिकवणीचा विसर पडू देऊ नये. अनोळखी व्यक्तींसोबत गप्पा मारू नये, आपल्या छायाचित्रांची देवाणघेवाण करू नये. चंदेरी दुनियाच्या मोहापासून महिलांनी स्वत:ला सुरक्षित ठेवून पाश्चात्त्य संस्कृतीला बळी पडू नये, असे ते यावेळी म्हणाले. मेळाव्यासाठी शहरातील विविध उपनगरांसह जिल्ह्यांमधून महिला वाहनांनी दाखल झाल्या. मेळाव्याचा समारोप सामूहिक प्रार्थना व दरुदोसलामच्या पठणाने करण्यात आला.