Nashik: मुंबईतून नाशिकला नायलॉन मांजाचा पुरवठा; पावणे दोन लाखांचे २१५ गट्टू जप्त
By अझहर शेख | Published: January 8, 2024 05:49 PM2024-01-08T17:49:43+5:302024-01-08T17:50:01+5:30
Nashik Crime News: नाशिक शहर व परिसरात पोलिस आयुक्तालयाकडून नायलॉन मांजा विक्री, वापर व साठवणूकीवर बंदी घालण्यात आली आहे. तरीदेखील चोरीछुप्या पद्धतीने नायलॉन मांजा विक्री सुरूच असल्याने पोलिसांनीही आता कारवाईचा धडाका लावला आहे.
- अझहर शेख
नाशिक - शहर व परिसरात पोलिस आयुक्तालयाकडून नायलॉन मांजा विक्री, वापर व साठवणूकीवर बंदी घालण्यात आली आहे. तरीदेखील चोरीछुप्या पद्धतीने नायलॉन मांजा विक्री सुरूच असल्याने पोलिसांनीही आता कारवाईचा धडाका लावला आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीवरून गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने सोमवारी (दि.८) मध्यरात्री सापळा रचला. यावेळी संशयित युवक मुंबईनाका येथे आला असता पथकाने शिताफीने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ असलेल्या गोणी व खोक्यामधून नायलॉन मांजाचे सुमारे २१५गट्टू जप्त करण्यात आले आहे.
चोरी, जबरी चोरी, हाणामारी, बलात्कार, खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्ह्यांत सक्रिय सहभागी असणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध तडीपारीची कारवाई पोलिसांकडून सातत्याने केली जाते; मात्र नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या सुमारे ४२ संशयित विक्रेत्यांना नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी तडीपार केले आहे. या सर्व संशयित विक्रेत्यांना २० दिवसांसाठी शहर व ग्रामिण भागात वावरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. पोलिसांकडून धडक कारवाई जरी सुरू असली तरी नायलॉन मांजा विक्री चोरीछुप्या पद्धतीने विक्री करणे किंवा विक्रीच्या उद्देशाने साठवणूक करण्याचे प्रकार सुरूच आहे.
गुन्हे शाखा युनिट-१चे अंमलदार नितिन जगताप व विलास चारोस्कर यांना गुप्त बातमीदाराकडून नायलॉन मांजा तस्करीची माहिती मिळाली. त्यांनी वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजय ढमाळ यांना याबाबत कळविले. ढमाळ यांनी तातडीने उपनिरिक्षक चेतन श्रीवंत, मिलिंदसिंग परदेशी, राजेश राठोड, राहुल पालखेडे, आदींचे पथक सज्ज करून सापळा रचण्याचे आदेश दिले. पथकाने मध्यरात्री मुंबईनाका पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर साध्या वेशात सापळा रचला. एक संशयित युवक हातात काही तरी ओझे घेऊन आला असता पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने अरबाज फिरोज शेख (२४,रा.भद्रकाली, जुने नाशिक) अशी ओळख सांगितली. त्याच्याकडे असलेल्या गोणी व खोक्याची तपासणी केली असता त्यामध्ये नायलॉन मांजाचे गट्टू आढळून आले. पोलिसांनी मुंबईनाका पोालिस ठाण्यात त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईचा पुरवठादार रडारवर
संशयित अरबाजची चौकशी केली असता त्याने नायलॉन मांजाचा माल मुंबईतील संशयित पुरवठादार अहमद काझी याच्याकडून घेतल्याची माहिती दिली. पोलिसांनी या संशयित अहमदचा तपास सुरू केला असून लवकरच त्यालाही या गुन्ह्यात ताब्यात घेण्यात येणार असल्याचे सांगितले.
तीन कंपन्यांचा मिळाला माल
संशयित अरबाजकडे सापडलेल्या २१५ गट्टूंमध्ये मोनो फाईटर, मोनो काईट, गो इंडिया गो अशा तीन वेगवेगळ्या कंपन्यांचा नायलॉन मांजाच्या गट्टूंचा समावेश आहे. हा सगळा माल अरबाज याने बांद्रा येथे राहणाऱ्या संशयित अहमद नावाच्या व्यक्तीकडून खरेदी केला. यामुळे आता त्याचाही पोलिस शोध घेत आहेत.