खासदार हेमंत गोडसेंच्या कार्यालयावर पेन्शनर्सचा थाळीनाद मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 12:05 PM2019-02-07T12:05:22+5:302019-02-07T12:09:27+5:30
नाशिकमध्ये पेन्शर्सधारकांनी शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे आणि भाजपाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या कार्यालयावर थाळीनाद मोर्चा काढला.
नाशिक : नाशिकमध्ये पेन्शर्सधारकांनी शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे आणि भाजपाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या कार्यालयावर थाळीनाद मोर्चा काढला. अर्थसंकल्पात ईपीएस 95 पेन्शनधारकांची पेन्शनवाढ झाली नाही तसेच भाजपा सरकारने सत्तेत आल्यानंतर किमान 3 हजार रुपये पेन्शन आणि महागाई भत्ता लागू करण्याचे जे आश्वासन दिले होते ते पाळले नाही. याउलट खासदार, आमदारांची पेन्शन वाढ झाली परंतु देश कष्टाने उभा करणाऱ्या कामगारांना पेन्शनवाढ का नाही ? हा जाब विचारण्यासाठी गुरूवार (7 फेब्रुवारी) खासदार हेमंत गोडसे यांच्या त्र्यंबक रोडवरील कार्यालयाजवळ पेन्शनधारक फेडरेशनने थाळीनाद आंदोलन केले.
खासदार गोडसे यांनी लोकसभेत पेन्शन धारकांच्या विविध विषयांवर चर्चा करुन पेन्शनवाढीसाठी आवाज उठवावा, अशी मागणी नाशिक जिल्हा इपीएस 95 पेन्शनधारक फेडरेशनच्या वतीने करण्यात आली. मोठ्या संख्येने पेन्शनर्स या आंदोलनात सहभागी झाले होते.