Nashik: वर्ष पुर्ण झाले अन् चोरटे पुन्हा आले, अंबडच्या इंडियन बँकेत वर्षभरानंतर पुन्हा चोरीचा प्रयत्न
By संकेत शुक्ला | Published: July 19, 2024 07:34 PM2024-07-19T19:34:09+5:302024-07-19T19:34:26+5:30
Nashik News: अंबड येथील वेलकम हॉटेल शेजारी असलेल्या इंडियन बँकेचे लॉकर फोडण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रयत्न करण्यात आला.
- नरेंद्र दंडगव्हाळ
सिडको - अंबड येथील वेलकम हॉटेल शेजारी असलेल्या इंडियन बँकेचे लॉकर फोडण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रयत्न करण्यात आला. विशेष म्हणजे याच बँकेत वर्षभरापूर्वी लॉकर फोडण्याचा प्रयत्न झाल्यानंतर त्यातील संशयित मोकाट असताना पुन्हा तसाच प्रकार घडल्याने धूम स्टाईल चोरीच्या प्रयत्नामुळे बँक प्रशासनाबरोबरच पोलिसांनाही आव्हान दिले गेले आहे.
गॅस कटरने गज कापून वरच्या मजल्यावरील स्लॅब फोडून बँकेत प्रवेश करण्याचा झालेला प्रयत्न किमान १ तास घेणारा होता. सुरक्षारक्षक असता तर ही घटना टळली असती, तसेच पोलिसांचे पेट्रोलिंगही कमी झाल्याने असे प्रकार वाढल्याचे बोलले जाते आहे. अंबड येथील इंडियन बँक गुरुवारी बंद करण्यात आल्यानंतर मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगितले जाते. छन्नी हातोड्याचा वापर करून बँकेच्या वरच्या रिकाम्या जागेतील स्लॅब चोरट्याने यासाठी फोडला. फोडलेल्या स्लॅबमधून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना बँकेतील सायरन वाजल्याने चोरट्याने येथून पळ काढला, अशी प्राथमिक माहिती आहे.
याबाबतची माहिती कळताच पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. शुक्रवारी सकाळी बँकेचे अधिकारी तसेच फॉरेन्सिक लॅबचे एक्सपर्ट दाखव झाले असून तपास सुरू करण्यात आला आहे. याप्रकरणी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. संशयित दरोडेखोरांचे शोधासाठी तीन पथके रवाना करण्यात आल्याची माहिती यावेळी पोलिसांनी दिली.