नाशिकलाही मधाचे बोट?
By admin | Published: January 22, 2017 12:24 AM2017-01-22T00:24:19+5:302017-01-22T00:24:34+5:30
डीसी रुल : सप्ताहात प्रसिद्धीची शक्यता
नाशिक : राज्य शासनाने पुणे शहराची विकास नियंत्रण नियमावली प्रसिद्ध करताना एफएसआयची खैरात करताना वादग्रस्त बीडीपी झोन व हिलटॉप हिल्सच्या बांधकामाचा निर्णय मात्र प्रलंबित ठेवला आहे. त्यामुळे, नाशिकचीही नियमावली जाहीर करताना पुण्याप्रमाणेच ‘एफएसआय’बाबत मधाचे बोट लावले जाण्याची शक्यता असून, ‘कपाट’चा वादग्रस्त मुद्दा मात्र प्रलंबित राहणार असल्याची चर्चा आहे. राज्यात नाशिकप्रमाणेच पुणे महापालिकेचीही निवडणूक होत आहे. त्यामुळे, राज्य शासनाने नाशिकसह पुण्याचा विकास आराखडा दि. ९ जानेवारी रोजी प्रसिद्ध करताना आराखड्याचाच अविभाज्य भाग असलेल्या विकास नियंत्रण नियमावली मात्र प्रसिद्ध केली नव्हती. त्यामुळे नाशिकचा ६ व ७.५० मीटर रस्त्यावरील टीडीआर आणि बहुचर्चित ‘कपाट’चा प्रश्न रेंगाळला. दरम्यान, महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने मतदारांवर प्रभाव टाकणारी नियमावली राज्य शासनाकडून प्रसिद्ध केली जाणार नाही, असे सांगितले जात असतानाच राज्य शासनाने गुरुवारी अचानक पुणे शहराची विकास नियंत्रण नियमावली प्रसिद्ध केली आणि त्यात एफएसआयची खैरात केली. त्यामुळे पुणेपाठोपाठ नाशिकचीही विकास नियंत्रण नियमावली प्रसिद्ध होण्याची अपेक्षा वाढली आहे. मात्र, ही नियमावली प्रसिद्ध करताना काही प्रमाणात दिलासा देणारे निर्णय घेऊन मधाचे बोट लावले जाण्याची शक्यता असून, ‘कपाट’सह टीडीआरचा मुद्दा प्रलंबित ठेवला जाणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, पुढील सप्ताहात नाशिकची विकास नियंत्रण नियमावली प्रसिद्ध होण्याची शक्यता असल्याचे खात्रीलायक वृत्त
आहे. (प्रतिनिधी)