नाशिकच्या प्रशिक्षकाची सुवर्ण रणनीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 01:41 AM2018-08-25T01:41:11+5:302018-08-25T01:42:04+5:30
महिलांच्या कबड्डी स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या इराण संघाच्या विजयाच्या शिल्पकार ठरल्या त्या नाशिकच्या शैलजा जैन. गेल्या दोन वर्षांपासून जैन या इराण संघाला प्रशिक्षण देत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली इराणने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण कामगिरी नोंदविली. इराणने बलाढ्य भारताचा पराभव केला असला तरी इराणच्या विजयामागे एक भारतीयच असल्याचा अभिमानही भारतीय क्रीडा जगतात व्यक्त केला जात आहे.
नाशिक : महिलांच्या कबड्डी स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या इराण संघाच्या विजयाच्या शिल्पकार ठरल्या त्या नाशिकच्या शैलजा जैन. गेल्या दोन वर्षांपासून जैन या इराण संघाला प्रशिक्षण देत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली इराणने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण कामगिरी नोंदविली. इराणने बलाढ्य भारताचा पराभव केला असला तरी इराणच्या विजयामागे एक भारतीयच असल्याचा अभिमानही भारतीय क्रीडा जगतात व्यक्त केला जात आहे.
शैलजा जैन या मूळ विदर्भातील असून, नागपूर क्रीडा कार्यालयात कबड्डी प्रशिक्षक म्हणून त्या सेवेत रुजू झाल्या होत्या; मात्र अल्पावधीतच त्यांची बदली नाशिकला झाली आणि त्या सेवानिवृत्तीपर्यंत नाशिककर म्हणूनच राहिल्या. साधारणपणे १९८०-८१ च्या काळात त्या नाशिकच्या क्रीडा कार्यालयात कबड्डी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांनी कबड्डी खेळ, खेळाडू आणि क्लबचा विकास करणे अपेक्षित आहे. त्यानुसार त्यांनी नाशिकमधील रचना क्लबमधील खेळाडूंना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यांच्या काळातच नाशिकच्या महिला कबड्डीचे नाव राज्य आणि राष्टÑीय पातळीवर आले. त्यांची पहिली राष्टÑीय खेळाडू ठरली ती संगीता बोरसे. त्यानंतर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील संघात भक्ती कुलकर्णी, निर्मला भोई, तनुजा कुलकर्णी, दीपाली सुचे, सुवर्णा क्षत्रिय यांनी नाशिकचे प्रतिनिधित्व केले. कबड्डीसाठी जैन यांनी घडविलेल्या खेळाडूंमुळे अनेक मुली या खेळाकडे वळल्या आणि नाशिकमध्ये कबड्डी मोठ्या प्रमाणात रुजली. मुलींचे अनेक संघ आणि क्लब अस्तित्वात आले. जैन यांचे कबड्डीतील योगदान लक्षात घेऊन त्यांना नाशिकमध्येच तालुका क्रीडा अधिकारी म्हणून पदोन्नतीदेखील मिळाली. प्रो-कबड्डी लीगच्या प्रशिक्षणाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. यातूनच इराण कबड्डी असोसिएशनने त्यांना प्रशिक्षणासाठी विचारणा केली. त्यांनी अर्ज केल्यानंतर सर्व चाचण्यामंधून त्यांची इराणच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून त्या इराणच्या संघाला प्रशिक्षण देत आहेत.
पहिला जिजामाता पुरस्कार
महाराष्टÑ शासानाने खेळातील महिला खेळाडू आणि प्रशिक्षणासाठी प्रारंभी जिजामाता पुरस्कार सुरू केला होता. त्यावेळी शैलजा जैन या पहिल्या महिला कबड्डी जिजामाता पुरस्कार विजेत्या ठरल्या होत्या. त्यानंतर हा पुरस्कार बंद झाला आणि सर्व खेळाडूंसाठी छत्रपती पुरस्कारच दिला जाऊ लागला. शैलजा जैन यांनी घडविलेल्या अनेक खेळाडू या छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू असून जैन स्वत: छत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू देखील आहेत.
भारतीय संघाकडे जिंकण्याची ईर्षाच नव्हती
सुवर्णपदकासाठीच्या अंतिम सामन्यात जी आक्रमकता आणि उमेद पाहिजे ती ईर्षा भारतीय महिला कबड्डी संघात दिसली नाही. किंबहुना त्यांनी हा सामना अतिशय सहज घेतल्याचे जाणवले. पहिल्या दोन पाच मिनिटांत भारताने काही पॉइंट्सची आघाडी मिळविली; मात्र टाइम आउट घेऊन इराणच्या खेळाडूंना आक्रमकता आणि बोनस पॉइंटवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. खेळाडूंनीही तसे वर्कआउट केले त्यामुळे इराणला सुवर्णपदक मिळविता आले.
- शैलजा जैन, प्रशिक्षक, इराण महिला कबड्डी संघ