वाहनांची तोडफोड करणाऱ्या संशयितांची परिसरात धिंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 11:29 PM2018-06-30T23:29:11+5:302018-06-30T23:32:56+5:30
नाशिक : सीतागुंफा रोडवरील शिवाजीचौकात शुक्रवारी पहाटेच्या सुमाराला मद्यधुंद अवस्थेत तीन चारचाकी वाहनांच्या काचा फोडून दहशत माजविणा-या तिघा संशयितांना पंचवटी पोलिसांनी शनिवारी (दि़३०) अटक केली़ तसेच संशयितांची परिसरातील दहशत लक्षात घेऊन नागरिकांच्या मनातील भीती दूर व्हावी यासाठी परिसरातून धिंड काढण्यात आली़
नाशिक : सीतागुंफा रोडवरील शिवाजीचौकात शुक्रवारी पहाटेच्या सुमाराला मद्यधुंद अवस्थेत तीन चारचाकी वाहनांच्या काचा फोडून दहशत माजविणा-या तिघा संशयितांना पंचवटी पोलिसांनी शनिवारी (दि़३०) अटक केली़ तसेच संशयितांची परिसरातील दहशत लक्षात घेऊन नागरिकांच्या मनातील भीती दूर व्हावी यासाठी परिसरातून धिंड काढण्यात आली़
पंचवटीतील शिवाजीचौकात शुक्रवारी (दि.२९) पहाटेच्या सुमारास रस्त्यालगत उभ्या असलेल्या तीन चारचाकी वाहनांच्या काचा फोडून समाजकंटकांनी नुकसान केले़ तसेच मुठाळ यांच्या घरावर दगडफेक केल्याची घटना घडली होती. त्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेचे वृत्त कळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली होती.
शिवाजी चौक परिसरातील नागरिकांनी शनिवारी सकाळी संशयित चेतन उमाकांत कानडे, केशव प्रल्हाद शिंदे व पंकज बालम जोंधळे या तिघांची नावे कळविली़ त्यानुसार पोलिसांनी या टवाळखोरांना हिरावाडी परिसरातून ताब्यात घेत कसून चौकशी केली असता त्यांनी मद्यधुंद अवस्थेत सुनील दामने यांची मारुती कार (क्रमांक एमएच १५ एएस १९३०), श्रीकांत खैरनार यांची मारुती ओमनी (एम एच १५ ए एस ६३३८) तसेच व्यंकटेश शिंपी यांची अल्टो कार क्रमांक (एमएच १५ डीएम ७४५४) या वाहनांच्या काचा फोडल्याची कबुली दिली.
यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या नेतृत्वाखाली चारचाकीच्या वाहनांच्या काचा फोडणारे टवाळखोर तसेच दोन महिन्यांपासून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्हात फरार असलेल्या किरण शेळके, नागेश शेलार या गुन्हेगारांची सीतागुंफारोड, शिवाजीचौक, काळाराम मंदिर परिसर, नागचौक आदी भागातून धिंड काढली़ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहायक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर, पोलीस हवालदार विलास बस्ते, सचिन म्हसदे, मोतीराम चव्हाण, सतीश वसावे, भूषण रायते, जितू जाधव, निंबाळकर आदींनी ही कामगिरी केली.