नाशकात घरोघरी दुमदुमला विठ्ठलनामाचा जयघोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:12 AM2021-07-21T04:12:17+5:302021-07-21T04:12:17+5:30
कोरोना पार्श्वभूमीवर मंदिरांमध्ये भाविकांना प्रवेश नसल्याने भाविकांविनाच सर्वत्र आषाढी एकादशीचा सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. मंदिराचे विश्वस्त ...
कोरोना पार्श्वभूमीवर मंदिरांमध्ये भाविकांना प्रवेश नसल्याने भाविकांविनाच सर्वत्र आषाढी एकादशीचा सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. मंदिराचे विश्वस्त आणि मुख्य पुजाऱ्यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि. २०) पहाटेपासूनच काकड आरतीने सुरू झालेला आषाढी एकादशीचा सोहळा सुमधुर स्वरातील अभंग व भजनांसह विठुरायाच्या विधिवत पूजेने साजरा करण्यात आला. शहरातील कॉलेज रोड, अशोक स्तंभ, गंगापूर रोड, नवीन नाशिक, नाशिकरोड, सातपूर, म्हसरूळ, अंबड आदी उपनगरांमधील विठ्ठल मंदिरांमध्ये आषाढी एकादशीनिमित्त पूजन करण्यात आले. शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये खास एकादशीनिमित्त आकर्षक सजावट करण्यात आली होती. पारंपरिक पूजेसह टाळ - मृदुंगाच्या गजरात विश्वस्त व पुजाऱ्यांनी मंगलमय विठ्ठल - रुक्मिणी मातेचे पूजन केले. दरम्यान, मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी होऊ नये, यासाठी मंदिर समिती तसेच पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
विठ्ठल नामस्मरणात नाशिककर दंग
शहरातील विविध विठ्ठल मंदिरांप्रमाणेच घरोघरी विठ्ठल नामस्मरणात नाशिककर दंग झाल्याचे दिसून आले. भाविकांनी विठ्ठल-रुक्मिणीचे पूजन करून कोरोनाचे संकट टळून बळीराजाच्या सुखासाठी दमदार पावसासाठी विठुमाउलीला साकडे घातले. कोरोनामुळे सध्या शहरातील शाळा बंद असल्याने शाळांनी ऑनलाइन पद्धतीने आषाढी एकादशी साजरी केली. त्यामुळे घराघरांत विठ्ठल, रुक्मिणीसह वारकऱ्यांची वेशभूषा केलेल्या चिमुकल्यांनी घराघरांतील वातावरण भक्तिमय केले होते.
200721\20nsk_80_20072021_13.jpg
कोरोनामुळे घरातच विठ्ठल रुक्मिनीची पूजा करताना भाविक