Nashik: ज्यांच्या प्रचाराची सांभाळली होती धुरा, त्यांच्याशीच आता घेतला पंगा
By Suyog.joshi | Published: April 25, 2024 02:14 PM2024-04-25T14:14:19+5:302024-04-25T14:15:19+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभेच्या दिंडोरी मतदारसंघात दिवसेंदिवस लढत रंगत असून एकेकाळी ज्यांच्याबरोबर काम केले, ज्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली अशा महाविकास आघाडीच्या भास्कर भगरे यांनी महायुतीच्या डॉ. भारती पवार यांच्याविरोधातच शड्डू ठोकत आव्हान दिले आहे.
- सुयाेग जोशी
नाशिक - लोकसभेच्या दिंडोरी मतदारसंघात दिवसेंदिवस लढत रंगत असून एकेकाळी ज्यांच्याबरोबर काम केले, ज्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली अशा महाविकास आघाडीच्या भास्कर भगरे यांनी महायुतीच्या डॉ. भारती पवार यांच्याविरोधातच शड्डू ठोकत आव्हान दिले आहे. त्यामुळे त्यांच्या या लढतीकडे साऱ्या जिल्ह्याचेच लक्ष लागून आहे.
अर्धशक्तिपीठ सप्तशृंगगड, रामशेज किल्ला, श्री क्षेत्र कर्दमाश्रम, श्री दत्तात्रेयांचे आजोळ करंजी, कोंगाईमाता मंदिर, चांदवड-कोटमगावची देवी मंदिरे आदी धार्मिक व ऐतिहासिक स्थळे असल्याने दिंडोरीची राज्यात स्वतंत्र ओळख आहे. कांदा व भाजीपाल्याचे आगार, द्राक्षपंढरीमुळे हा परिसर सधन मानला जातो. २००८ मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेत दिंडोरी लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. त्यापूर्वी तो जनता दलाचा बालेकिल्ला राहिलेला मालेगाव लोकसभा म्हणून देशभर परिचित होता. मूळचे काँग्रेसचे असलेले हरिश्चंद्र चव्हाण २००४ मध्ये कमळाच्या चिन्हावर मालेगावमधून निवडून आले. दिंडोरी लोकसभा अस्तित्वात आल्यानंतर २००९ आणि २०१४ मध्येही चव्हाण यांनी भाजपच्या साथीने बाजी मारली. २०१४ मध्ये हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासमोर माजी आदिवासी विकास मंत्री स्व. ए.टी.पवार यांच्या स्नूषा डॉ. भारती पवार राष्ट्रवादीकडून रिंगणात होत्या. त्यावेळी भास्कर भगरे हे राष्ट्रवादीचे दिंडोरी तालुकाध्यक्ष होते अन अजूनही तेच आहेत. त्यांच्यावरच भारती पवार यांच्या संपूर्ण प्रचाराची धूरा होती. तेच भगरे आता पवार यांच्याविरोधात उभे आहेत. त्यावेळी हरिश्चंद्र चव्हाण यांना ५,४२,७८४ मते तर भारती पवार यांना २,९५,१६५ मते पडली होती. चव्हाण हे २,४७,६१९ मतांनी निवडून आले होते.
पुढे २०१९ मध्ये भाजपने चव्हाण यांना नाकारून माजी मंत्री ए. टी. पवारांच्या स्नुषा डॉ. पवार यांना राष्ट्रवादीतून आयात करून उमेदवारी दिली. तर राष्ट्रवादीने धनराज महाले यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी भगरे यांनी महाले यांचाही प्रचारही सांभाळला होता. परंतु त्या निवडणुकीत भारती पवार यांना ५,६७,४७० तर महाले यांना ३,६८,६९१ मते पडली होती. त्यामुळे भारती पवार तब्बल १,९८,७७९ मतांनी विजयी झाल्या होत्या. २०१९ मध्ये भाजपने त्यांच्या रुपाने पहिली महिला खासदार आणि पहिल्यांदाच केंद्रीय राज्यमंत्रिपदही मतदारसंघाला मिळाले. त्यामुळे सद्यस्थितीत भारती पवार यांच्यासाठी एकेकाळी राष्ट्रवादीकडून प्रचाराची धूरा सांभाळणारे भगरे हे त्यांनाच कसे आव्हान देणार याकडे मतदारसंघाचे लक्ष लागून आहे.
डॉक्टर विरुद्ध शिक्षक
पवार विरुद्ध भगरे यांच्यातील ही लढत म्हणजे केंद्रीय मंत्री यांच्याविरोधात एका शिक्षकामधील निकराची लढाई पहायला मिळणार आहे. भारती पवार यांच्यावर भाजप नेतृत्वाने विश्वास दाखवत पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी दिली आहे. त्या उलट भगरे हे शरद पवारांच्या विश्वासातील दिंडोरीतील राष्ट्रवादीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी भास्कर भगरे यांनी अनेक आंदोलन केली आहेत. भगरे हे माजी जिल्हा परिषद सदस्य देखील आहेत.