नाशिक आता रशियन शहराची सिस्टर सिटी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 01:03 AM2018-10-13T01:03:37+5:302018-10-13T01:03:52+5:30
जगातील महानगर जोडून त्यांचा समान विकास करण्याच्या संकल्पेतून आता रशियन फेडरेशनने पुढाकार घेतला असून, तेथील उलान उडे या शहराची नाशिक शहर भगिनी (सिस्टर सिटी) करण्याचा प्रस्ताव आहे.
नाशिक : जगातील महानगर जोडून त्यांचा समान विकास करण्याच्या संकल्पेतून आता रशियन फेडरेशनने पुढाकार घेतला असून, तेथील उलान उडे या शहराची नाशिक शहर भगिनी (सिस्टर सिटी) करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासंदर्भात राज्य सरकारने नाशिक महापालिकेला विचारणा केली असून, त्यासंदर्भातील प्रस्ताव शासनाला सादर करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
झपाट्याने विकसित होत असलेल्या नाशिक शहराचे नाव वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये घेतले जाते. नाशिक शहराचे भौगोलिक आणि धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन हे शहर जागतिक दर्जाचे व्हावे यासाठी शासकीय पातळीवरदेखील यापूर्वी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानाअंतर्गत नाशिक शहराची निवड करताना विकासाचा वेग, लोकसंख्या आणि तीर्थक्षेत्र हे तीन निकष महत्त्वाचे होते. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील ६२ शहरांत नाशिकचा समावेश होता. त्यानंतर केंद्र सरकाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात दुसºया टप्प्यात का होईना नाशिकची निवडदेखील या शहराचे महत्त्व अधोरेखित करणारीच आहे.
या प्रस्तावानुसार उभय शहरांमध्ये आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि वैज्ञानिक उपक्रमांची देवाणघेवाण करणे, पीपीपी
अंतर्गत उपक्रम राबविणे, दोन्ही शहरांमधील राजकीय व प्रशासकीय नेतृत्व विकसित करणे या स्वरूपाचे उपक्रम असतील. सिस्टर सिटी डेव्हलपमेेंटचा प्रस्ताव तीन वर्षांसाठी असेल आणि सहा महिने मुदतवाढ देता येणार आहे.
जर्मन सरकारकडून यापूर्वी प्रस्ताव
नाशिक शहर सिस्टर सिटी म्हणून विकसित करण्यासाठी यापूर्वीदेखील जर्मन सरकारने प्रस्ताव पाठविला होता. त्यानंतर चीन सरकारचादेखील एक प्रस्ताव होता. महापालिकेने त्यास होकारही भरला होता; परंतु नंतर डोकलामवरून भारत-चीन संबंध ताणले गेले आणि हा विषय मागे पडला. आता रशियन फेडरेशनकडून नवा प्रस्ताव सादर करण्यात आला असून, त्यामुळे केंद्र सरकारने हा राज्य सरकारकडे आणि तेथून तो महापालिकेला सादर करण्यात आला आहे.