नाशिकमध्ये आता फेरीवाल्यांची होणार निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 12:47 AM2019-01-24T00:47:07+5:302019-01-24T00:47:24+5:30
शहरातील फेरीवाला हा खरे तर उपेक्षित आणि असंघटित घटक, परंतु त्यांना आता संघटित करून त्यांच्यासाठीच शहर फेरीवाला समिती गठित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे त्यासाठी कामगार उपआयुक्त कार्यालयामार्फत रीतसर निवडणुका घेण्यात येणार आहे.
नाशिक : शहरातील फेरीवाला हा खरे तर उपेक्षित आणि असंघटित घटक, परंतु त्यांना आता संघटित करून त्यांच्यासाठीच शहर फेरीवाला समिती गठित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे त्यासाठी कामगार उपआयुक्त कार्यालयामार्फत रीतसर निवडणुका घेण्यात येणार आहे. त्यासाठी मतदार फेरीवाल्यांची खातरजमा केली जात असून, साडेनऊ हजार फेरीवाल्यांची यादी तयार झाल्यानंतर ही निवडणूक कामगार उपआयुक्त कार्यालयात होणार आहे.
नाशिक शहरात यापूर्वी नगरपालिका काळात फेरीवाल्यांना परवाने देण्यात आले होते. त्यानंतर फेरीवाला क्षेत्राची सातत्याने होत असलेली मागणी केंद्र सरकारच्या फेरीवाला धोरणामुळे पूर्ण होत आहे. नाशिक शहरात एकूण अडीचशे फेरीवाला क्षेत्र तयार करण्यात आले असून, त्यातील ८७ क्षेत्रातील वाद किंवा आक्षेप वगळता अन्य ठिकाणी फेरीवाले स्थलांतरितदेखील झाले आहेत. महापालिकेने खासगी संस्थेमार्फत व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केल्यानंतर एकूण ९ हजार ६०० फेरीवाल्यांची नोंद झाली असून, त्यांनाच या क्षेत्रात महापालिका सामावून घेतले जात आहे. फेरीवाला धोरणाचा एक भाग म्हणून शहर फेरीवाला समितीचे पुनर्गठन होणार असून त्यासाठी फेरीवाल्यांना त्यांचेच प्रतिनिधी निवडून देण्यासाठी अन्य संस्थांच्या निवडणुकांप्रमाणेच निवडणुका घेण्यात येणार आहे. यासंदर्भात महापालिकेच्या वतीने साडेनऊ हजार फेरीवाल्यांच्या बायोमेट्रिक हजेरी घेऊन खातरजमा करण्यात येत आहे. हे काम संपल्यांनतर सर्व यादी कामगार उपआयुक्त कार्यालयाकडे पाठविली जाणार आहे. तीच मतदार म्हणून मान्य करून हरकती व सूचना मागविण्याबरोबरच निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात येणार आहे. अन्य निवडणुकांप्रमाणेच उमेदवारीसाठी अटी, नियम असतील आणि पॅनलदेखील उभे करून निवडणुका लढविता येणार आहे. त्यामुळे लवकरच आता शहर फेरीवाला समितीसाठी पडघम वाजू लागणार आहे.
सध्याची प्रशासन नियुक्त समिती
यापूर्वीची शहर फेरीवाला समिती महापालिकेने अर्ज मागवून गठित केली. परंतु त्यावरही काही आक्षेप आहेत, परंतु आता त्यापुढे जाऊन सर्वांनाच या निवडणुकीत सहभागी होता येणार आहे. नाशिक शहरात विविध राजकीय पक्ष प्रणित फेरीवाला संघटना असून, त्यांना आता ही निवडणूक नांदी ठरणार आहे.