नाशिकचा युवक अमेरिकन क्रिकेट प्रीमिअर लीगमध्ये !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:19 AM2021-09-17T04:19:23+5:302021-09-17T04:19:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : नाशिकच्या गल्ल्यांमध्ये आणि मैदानांवर क्रिकेटचे प्राथमिक धडे गिरवलेला, नाशिकच्या रचना हायस्कूलमध्ये शिक्षण घेऊन पुढे ...

Nashik youth in American Cricket Premier League! | नाशिकचा युवक अमेरिकन क्रिकेट प्रीमिअर लीगमध्ये !

नाशिकचा युवक अमेरिकन क्रिकेट प्रीमिअर लीगमध्ये !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : नाशिकच्या गल्ल्यांमध्ये आणि मैदानांवर क्रिकेटचे प्राथमिक धडे गिरवलेला, नाशिकच्या रचना हायस्कूलमध्ये शिक्षण घेऊन पुढे अभियंता बनत नामांकित कंपन्यांमध्ये काम करीत अमेरिकेपर्यंत मजल मारण्याची किमया नीरज शेखर परांजपे या युवकाने साधली होती. करिअरबरोबरच क्रिकेटची आवड जोपासत असल्यानेच नीरजने प्रथमच होत असलेल्या ‘अमेरिकन प्रीमिअर लीग २०२१’ मध्ये बॅटिंग ऑलराउंडर म्हणून एका संघात स्थान मिळवले आहे.

नाशिकच्या रचना हायस्कूलमधून शालेय तर पुणे युनिव्हर्सिटीतून इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड टेलिकम्युनिकेशनमध्ये अत्यंत चांगल्या गुणांनी इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त करतानाही त्याने क्रिकेटची आवड जोपासली होती. त्यानंतर पुण्यातच टेक महिंद्रा कंपनीत अभियंता म्हणून रुजू झाला. काही कालावधीनंतर कंपनीने त्याला २०१७ साली वर्क व्हिसावर अमेरिकेत पाठवले. फाइव्ह डे वीकच्या कल्चरमध्ये बारा-बारा तास काम करत असतानाही वीकेंडला दोन दिवस क्रिकेटचा सराव आणि सामने खेळण्याची आवड नीरजने कायम राखली. अत्यंत मोठ्या, नामांकित कंपन्यांसाठी नेटवर्क इंजिनिअर म्हणून नियमितपणे काम करत असतानाही नीरजने त्याच्या सरावात कधीच खंड पडू दिला नाही. अगदी विवाहानंतरदेखील त्याने प्रत्येक शनिवार, रविवारीदेखील क्रिकेटचा नियमित सराव आणि फिटनेसवर भर कायम ठेवला आहे.

इन्फो

बॅटिंग ऑलराउंडर म्हणून निवड

अमेरिकेतील न्यू जर्सी येथे खेळल्या जाणाऱ्या २० षटकांच्या अनेक स्थानिक क्रिकेट लीगमध्येदेखील त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर दमदार कामगिरी नोंदवत ‘बॅटिंग ऑलराउंडर’ म्हणून छाप पाडली. त्यामुळेच अमेरिकेत प्रथमच होत असलेल्या ‘अमेरिकन क्रिकेट प्रीमिअर लीग’मध्ये बेंगालीज या संघात त्याची ऑलराउंडर म्हणून निवड झाली आहे.

इन्फो

२० सप्टेंबरपासून लीगला प्रारंभ

अमेरिकेत सर्वाधिक लोकप्रिय खेळ म्हणून बेसबॉल ओळखला जातो. मात्र, गत दशकापासून तिथेदेखील क्रिकेट रंगू लागले आहे. काही वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकरने अमेरिकेत मास्टर्स क्रिकेट लीग भरवून अमेरिकेत क्रिकेट रुजवण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ केला होता. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत ही पहिलीच राष्ट्रीय क्रिकेट लीग न्यू जर्सीतील योगी बेरा बेसबॉल स्टेडियममध्ये २० ते ३० सप्टेंबरदरम्यान रंगणार आहे. यूएसए क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून अमेरिकेत प्रथमच होणार असलेल्या या लीगला नागरिकांचाही खूप चांगला प्रतिसाद मिळण्याची चिन्हे आहेत.

फोटो

१६नीरज

१६टीम

Web Title: Nashik youth in American Cricket Premier League!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.