कोरोनाला अटकाव : नाशिक जिल्हा परिषदेच्या आठ अधिकाऱ्यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 04:11 PM2020-03-31T16:11:58+5:302020-03-31T16:13:02+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याबरोबरच संचारबंदीच्या काळात ग्रामीण भागातील जनतेला जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा त्याच बरोबर मुलभूत सुविधा पोहोचविणे सुखकर व्हावे
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना बाधित रूग्ण सापडल्यामुळे जिल्हा परिषदेने त्याची गंभीर दखल घेतली असून, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याबरोबरच संचारबंदीच्या काळात ग्रामीण भागातील जनतेला जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा त्याच बरोबर मुलभूत सुविधा पोहोचविणे सुखकर व्हावे यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्हा परिषदेच्या आठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या अधिका-यांना कामांचे वाटप करण्यात आले आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रामुख्याने हे अधिकारी आपले लक्ष केंद्रीत करतील व त्यांच्या कामांचा दैनंदिन अहवाल सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. या अधिका-यांमध्ये प्रकल्प संचालक उज्वला बावके यांना ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समुह तसेच निधीचे नियोजनाची जबाबदारी सोपविण्यात आली असून, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे यांना परदेशातून ग्रामीण भागात येणाºया नागरिकांची नोंद घेणे तसेच त्यांना घरातच विलीगीकरण कक्षात ठेवण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सुचना आहेत. वित्त व लेखा अधिकारी महेश बच्छाव यांना आवश्यक त्या औषधांची उपलब्धतता करून देण्याची तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेलकंदे यांना आरोग्य केंद्रातील सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी व कर्मचा-यांची हजेरीबाबत नोंद घेण्याचे काम सोपविण्यात आले आहे. कार्यकारी अभियंता मंगेश खैरनार यांना सर्व गावांमधील पाणी पुरवठा सुरूळीत ठेवणे त्याच बरोबर रूग्णवाहिकांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र परदेशी यांना ग्रामीण भागातील सार्वजनिक वितरण प्रणालवर देखरेख त्याच बरोबर ग्रामपंचायतींमध्ये औषध फवारणीवर लक्ष ठेवण्याचे काम सोपविण्यात आले आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपक चाटे यांच्यावर अंगणवाडीतील बालकांवर ताजा पोषण आहार पुरविण्याची तर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्यावर शालेय पोषण आहार वितरणाबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची सुचना आहे. आरोग्य विभागाचे विशाल नायडू यांच्यावर कोरोना संदर्भात शासनाकडून येणाºया माहितीचे संकलन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.