नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर ८ लाखांची लाच घेताना जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 10:53 PM2021-08-10T22:53:34+5:302021-08-10T22:53:53+5:30
मंजुर अनुदानानुसार वेतन देण्यासाठी नऊ लाखांची मागितली होती लाच
नाशिक : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी संशयित वैशाली पंकज विर उर्फ झनकर (४४) यांनी तक्रारदाराकडे सुमारे नऊ लाखांची लाचेची मागणी केली होती. तडजोडअंती आठ लाखांची रक्कम शासकिय चालकाला पाठवून ती स्विकारताना झनकर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात मंगळवारी (दि.१०) संध्याकाळी अडकल्या. पथकाने संशयित चालकासह एका शिक्षकालाही याप्रकरणी ताब्यात घेतले आहे.
शासनाने मंजुर केलेल्या दोन शिक्षणसंस्थांच्या शाळांच्या वीस टक्के अनुदानानुसार नियमित वेतन सुरु करण्याकरिता झनकर यांनी कार्यादेश काढण्यासाठी लाचेची रक्कम मागितली होती. यानंतर तक्रारदार संस्थाचालकाने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या राज्याचे महासंचालकांकडे तक्रार केली होती. यानुसार त्यांच्या आदेशान्वये ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची शहनिशा करत पडताळणी केली असता त्यामध्ये तथ्य जाणवले. यानुसार ठाणे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांच्या आदेशान्वये मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकातील सापळा अधिकारी पल्लवी ढगे यांच्या पथकाने नाशिक जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारालगत सापळा रचला.
मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास तडजोड व्यवहारात ठरल्याप्रमाणे आठ लाखांची रक्कम स्विकारण्यासाठी झनकर यांचा शासकिय मोटार वाहनचालक ज्ञानेश्वर सुर्यकांत येवले हा जिल्हा परिषदेबाहेरील सिग्नलजवळ आला असता त्याने तक्रारदारकाडून रक्कम स्विकारताच पथकाने त्यास रंगेहाथ ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता झनकर यांच्या आदेशान्वये त्याने रक्कम घेतल्याचे समजल्यानंतर पथकाने जिल्हा परिषदेच्या वास्तुमध्ये धडक देत झनकर यांनाही चौकशीकरिता ताब्यात घेतले.
ढगे यांनी झनकर यांची या गुन्ह्याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत जिल्हा परिषदेत चौकशी व पडताळणी केली असता त्यांनी तडजोअंती ८ लाखांची रक्कम स्विकारल्याचे मान्य करत पुढील व्यवहार चालक येवलेसोबत करण्यास सांगितले होते, अशी माहिती पथकाच्या सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, याप्रकरणी राजेवाडी प्राथमिक शाळेचे शिक्षक पंकज रमे दशपुते यांनाही पथकाने ताब्यात घेतले आहे. रात्री उशीरापर्यंत याप्रकरणी कायदेशीर प्रक्रिया राबविली जात होती. जिल्हा परिषदेची वास्तू भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने या पोलीस ठाण्यात झनकर यांच्याविरुध्द ठाण्याचा पथकाकडून भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची श्यक्यता वर्तविली जात आहे.