गणेशोत्सवाची जबरदस्तीने वर्गणी मागणाºयांविरोधात खंडणीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 05:40 PM2017-08-19T17:40:33+5:302017-08-19T17:40:40+5:30
नाशिक : सार्वजनिक गणेशोत्सवासाठी जबरदस्ती ११ हजार रुपयांची वर्गणी वसूल करणारे कामगार क्रांती माथाडी संघटनेच्या अध्यक्षासह चार पदाधिकाºयांवर अंबड पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ यापैकी तिघांना अटक करण्यात आली असून एक जण फरार आहे़
दिलीप त्र्यंबक वाघ (प्लॉट नंबर एच ११७, अंबड,नाशिक ) यांनी अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची अंबड औद्योगिक वसाहतीत प्रतिण मशिन टूल्स नावाची कंपनी आहे़ कामगार क्रांती माथाडी संघटना प्रणित संस्कृत फाऊंडेशन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी संशयित अक्षय परदेशी, केतन क्षीरसागर, भगवान घुगे व आबा देशमुख हे शुक्रवारी (दि़१८) सकाळी दहा वाजेच्या सुमारास विनापरवानगी कंपनीत घुसले़ त्यांनी गणपती मंडळासाठी अकरा हजार रुपयांची वर्गणीची मागणी करून न दिल्यास कंपनीत काम होऊ देणार नाही, बघून घेतो अशी धमकी दिली़
या प्रकरणी वाघ यांच्या फिर्यादीवरून मंडळाच्या या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, गणेशोत्सवात कोणत्याही मंडळाच्या पदाधिकारी वा कार्यकर्ते यांना जबरदस्तीने वर्गणी मागता येणार नाही़ अशा प्रकारच्या तक्रारी आल्यास संबंधितांवर खंडणीचे गुन्हे दाखल केले जातील असे पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल यांनी नुकत्याच झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत सांगीतले होते़