नाशिककरांना जाणवतोय उन्हाचा चटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:50 AM2019-03-28T00:50:36+5:302019-03-28T00:51:05+5:30
शहराचे कमाल-किमान तापमान वाढू लागले असून, वातावरणात उष्मा जाणवू लागला आहे. वाढत्या उन्हाचा नाशिककरांना चटका बसत असून, शहरातील रस्ते दुपारपासून संध्याकाळपर्यंत ओस पडू लागले आहे.
नाशिक : शहराचे कमाल-किमान तापमान वाढू लागले असून, वातावरणात उष्मा जाणवू लागला आहे. वाढत्या उन्हाचा नाशिककरांना चटका बसत असून, शहरातील रस्ते दुपारपासून संध्याकाळपर्यंत ओस पडू लागले आहे. बुधवारी (दि.२७) कमाल तापमानाचा पारा ३८.५ अंशांपर्यंत वर सरकल्याची नोंद हवामान केंद्राकडून करण्यात आली.
मार्चअखेर संपूर्ण राज्यात उष्मा वाढला असून, विदर्भासह उत्तर महाराष्टÑालाही उन्हाच्या तीव्रतेचा फटका बसत आहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान अमरावती जिल्ह्यात बुधवारी नोंदविले गेले तर सर्वाधिक कमी तापमानाची नोंद अहमदनगरला झाली. नाशिक शहराचेही तापमान मार्चअखेर ३९ अंशांच्या पुढे सरकले होते. दोन दिवसांपूर्वी शहराचा पारा ३९.३ अंशांपर्यंत वाढला होता. किमान तापमानातही वाढ होत असून, १७.४ अंश इतके किमान तापमान बुधवारी नोंदविले गेले. यामुळे रात्रीदेखील नागरिकांना उष्म्याच्या त्रास जाणवत आहे. त्यामुळे कूलर, पंखे, वातानुकूलित यंत्राच्या वापरावर नागरिक भर देत आहेत. घरे, कार्यालयांमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत पंखे, वातानुकूलित यंत्रे चालविली जात आहे. असह्य वाटणाऱ्या झळांपासून बचाव करण्यासाठी शीतपेयांचा आधार घेतला जात आहे.
वातावरणात वाढलेल्या उष्म्याने जिवाची काहिली होत असून, नागरिक थंड गुणधर्म असलेली फळे खाण्यास प्राधान्य देत आहे. यामुळे टरबूज, खरबूज, फणस, काकडी यांसारख्या फळांना मागणी वाढली आहे. हंगामी विक्रेत्यांची चलती असून, रस्तोरस्ती झाडांच्या सावलीला लिंबू पाणी, ऊस रसवंती गुºहाळ, फळविक्रेते मोसंबी, संत्र विक्रेते नजरेस पडत आहेत.