पाणीबचत आता नाशिककरांच्या हाती

By Admin | Published: November 4, 2015 11:57 PM2015-11-04T23:57:01+5:302015-11-04T23:57:27+5:30

जलसंकट : काटकसर न केल्यास आणखी पाणीकपातीचे ढग

Nashikar's water now saved | पाणीबचत आता नाशिककरांच्या हाती

पाणीबचत आता नाशिककरांच्या हाती

googlenewsNext

नाशिक : गंगापूर धरण समूहातून अखेर मराठवाड्यातील जायकवाडीसाठी एकूण १३५५ दलघफू पाणी सोडले जात असल्याने शिल्लक राहणाऱ्या ४६६६ दलघफू पाण्यापैकी नाशिक महापालिकेला जुलै २०१६ अखेर सुमारे ३४०० दलघफू पाणी पिण्यासाठी लागणार आहे. उर्वरित १२५० दलघफू पाण्याचा वापर औद्योगिक वसाहत, एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र, मेरी आदिंसह सिंचनासाठी कसा आणि किती करायचा याचा निर्णय जिल्हा प्रशासनाला घ्यावा लागणार आहे. मात्र, भविष्यातील जलसंकट लक्षात घेता पाणीबचत आता नाशिककरांच्याच हाती असून, काटकसर न केल्यास आणखी पाणीकपातीचे ढग दाटून येण्याची शक्यता आहे.
गंगापूर धरण समूहातून अखेर जायकवाडीसाठी पाणी सोडण्याच्या निर्णयावर अखेर सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग उघड्या डोळ्यांनी पाहण्याचे दुर्भाग्य नाशिककरांवर आले.
गंगापूर धरण समूहातून पाणी सोडण्याचा निर्णय झाल्यानंतर दि. ४ नोव्हेंबर अखेर धरण समूहातून १३५५ पैकी ९३ दलघफू पाणी सोडण्यात आले, तर अजून १२६२ दलघफू पाणी सोडले जाणार आहे. दि. ४ नोव्हेंबर अखेर गंगापूर धरण समूहात ५७२८ दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातून जायकवाडीला पाणी सोडल्यानंतर एकूण ४६६६ दलघफू पाणीसाठा शिल्लक राहणार आहे आणि हाच पाणीसाठा आता जिल्हा प्रशासनाला जुलै-आॅगस्ट २०१६ पर्यंत पुरवायचा आहे.
महापालिकेने सन २०१५-१६ या वर्षासाठी जिल्हा प्रशासनाकडे ४६०० दलघफू इतक्या पाणी आरक्षणाची मागणी नोंदविलेली आहे. मनपाकडून गंगापूर धरणातून प्रतिदिन सुमारे ४१० दशलक्ष लिटर पाणी उचलले जाते. म्हणजे प्रतिदिन १४.५० दलघफू इतके पाणी उचलले जाते. परंतु महापालिकेने धरणातील पाण्याचा अत्यल्प साठा लक्षात घेता ९ आॅक्टोबरपासूनच शहरात एक वेळ पाणीपुरवठा सुरू केला आहे.

पाणीकपात आता जुलैपर्यंत?

शहराची लोकसंख्या १८ लाखांहून अधिक असून, दिवसेंदिवस पाण्याची मागणी वाढतेच आहे. सद्यस्थितीत महापालिकेकडून गंगापूर धरणातून प्रतिदिन ४१0 ते ४२0 दशलक्ष लिटर पाणी उचलले जाते. सिंहस्थ कुंभमेळा काळात महापालिकेने प्रतिदिन ४६0 दशलक्ष लिटर पाणी उचलले होते. नाशिक महापालिकेला जुलै २0१६ अखेरपर्यंत सुमारे ३४00 दलघफू पाणी लागणार आहे. सदर पाणी जपून वापरण्यासाठी महापालिकेला सध्या सुरू करण्यात आलेली २0 टक्के पाणीकपात जुलैपर्यंत कायम ठेवणे भाग पडणार आहे. सन २0१६ मध्ये उन्हाळा कडक गेल्यास बाष्पीभवनाचाही पाणीसाठय़ावर परिणाम होऊ शकतो. शिवाय जून-जुलैमध्येही पावसाने पाठ फिरविल्यास जलसंकट गडद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिककरांना आतापासूनच पाण्याचा काटकसरीने आणि सुयोग्य वापर करणे क्रमप्राप्त ठरणार आहे. त्याचबरोबर महापालिकेलाही हॉटेल व्यावसायिक, सर्व्हिस स्टेशन, उद्यानांमधील पाणीपुरवठा यावर कठोर नियंत्रण आणावे लागणार आहे.

Web Title: Nashikar's water now saved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.