संजीवनीच्या कामगिरीकडे नाशिककरांचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 04:27 PM2018-08-24T16:27:48+5:302018-08-24T16:30:08+5:30
जकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नाशिकची धावपटू संजीवनी जाधव ही शनिवारी (दि. २५) १० हजार मीटर शर्यतीत धावणार असल्याने तिच्या कामगिरीकडे तमाम नाशिककरांचे लक्ष लागून आहे.
नाशिक : जकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नाशिकची धावपटू संजीवनी जाधव ही शनिवारी (दि. २५) १० हजार मीटर शर्यतीत धावणार असल्याने तिच्या कामगिरीकडे तमाम नाशिककरांचे लक्ष लागून आहे. लांब पल्ल्याच्या शर्यतीत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या संजीवनीकडून भारताला पदकाची अपेक्षा आहे. शनिवारी सायंकाळी ५ वाजता संजीवनीची स्पर्धा चॅनल्सवर पाहता येणार आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात पदकांची संख्या वाढत असताना संजीवनीच्या रूपाने आणखी एक पदक भारताला मिळण्याची दाट शक्यता आहे. भूतान येथील सरावानंतर परदेशी वातावरणाशी जुळवून घेत फिटनेस कायम राखल्यामुळे संजीवनीची कामगिरी या स्पर्धेत उंचावण्याची शक्यता आहे. संजीवनीने यापूर्वी तुर्कस्तानच्या खेळाडूंबरोबरच स्पर्धा केलेली असल्यामुळे त्यांच्याबरोबर ती चुरशीची स्पर्धा नक्कीच करू शकेल; मात्र बहरिन आणि केनियन खेळाडूंचे काही प्रमाणात आव्हान तिच्यासमोर असणार आहे.
कविता राऊत हिच्यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत नाशिकची खेळाडू म्हणून सहभागी झालेल्या संजीवनीकडून नाशिककरांच्या मोठ्या अपेक्षा आहे. कविताने तिच्या दोन्ही इव्हेंटमध्ये दोन पदके पटकाविली होती. अशीच कामगिरी संजीवनीदेखील करू शकेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. नाशिकच्या क्रीडाक्षेत्राकडून संजीवनीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
नाशिकच्याच चांदवड येथील दत्तू भोकनळ याने नौकानयनामध्ये सांघिक गटात सुवर्णपदक मिळविल्यानंतर नाशिकच्याच संजीवनीकडे आता नाशिककरांच्या नजरा आहेत. शनिवारी १० हजार मीटर आणि येत्या २८ रोजी ५ हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत संजीवनी धावणार आहे.