नाशिकमध्ये चौघा संशयितांच्या जबर मारहाणीत बजरंग दल कार्यकर्त्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 03:12 PM2018-05-21T15:12:42+5:302018-05-21T16:03:40+5:30
नाशिक : सातपूरच्या एका बारमध्ये मद्यसेवन करीत बसलेल्या इंदिरानगरमधील तरुणास चौघा संशयितांनी सातपूरच्या महादेववाडीत नेऊन जबर मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि़१९) मध्यरात्रीच्या सुमारास घडली़ या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा सोमवारी (दि़२१) सकाळी उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला़ हर्षल वसंत साळुंखे (रा़ इंदिरानगर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो बजरंग दलाचा सक्रिय कार्यकर्ता होता़ दरम्यान, बजरंग दलाने हर्षलचा मृत्यू संशयास्पद असून त्याच्या मारेक-यांना त्वरीत अटक तसेच खूनाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी बजरंग दलाने सातपूर पोलीस ठाण्यात रविवारी दोन तास ठिय्या आंदोलन केले़
नाशिक : सातपूरच्या एका बारमध्ये मद्यसेवन करीत बसलेल्या इंदिरानगरमधील तरुणास चौघा संशयितांनी सातपूरच्या महादेववाडीत नेऊन जबर मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि़१९) मध्यरात्रीच्या सुमारास घडली़ या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा सोमवारी (दि़२१) सकाळी उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला़ हर्षल वसंत साळुंखे (रा़ इंदिरानगर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो बजरंग दलाचा सक्रिय कार्यकर्ता होता़ दरम्यान, बजरंग दलाने हर्षलचा मृत्यू संशयास्पद असून त्याच्या मारेक-यांना त्वरीत अटक तसेच खूनाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी बजरंग दलाने सातपूर पोलीस ठाण्यात रविवारी दोन तास ठिय्या आंदोलन केले़
सातपूर पोलीस ठाण्यात मृणाल घोडके (२८,द्वारका, नाशिक) यांनी सातपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा मित्र मयत हर्षल साळुंखे हा शनिवारी (दि़१९) रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास सातपूरच्या कुमारा बारमध्ये मद्यप्राशन करीत होता़ रात्री अडीच वाजेच्या सुमारास हर्षलने फोन करून प्रमोद डांगरे, सुधीर भालेराव, सुनील गांगुर्डे व मुकेश मगर यांच्यासोबत बाचाबाची झाली असून तु ताबडतोब ये असा फोन केला मात्र नेहेमीचे असल्याने गेलो नाही़ सकाळी हर्षलचे वडील वसंत साळुंखे यांचा फोन आला व त्यांनी सांगितले की, हर्षलवर रात्री हल्ला झाला असून तो जिल्हा रुग्णालयात आहे़ त्यानुसार जिल्हा रुग्णालयात गेले असता एका अनोळखी व्यक्तीने हर्षलला गाडीवरून (एमएच १५, ईव्ही ७८४५) उपचारासाठी दाखल केले असून तो मुंबई नाक्याजवळील कालिका मंदिराजवळ पडलेला असल्याचे सांगितले़
यानंतर घोडके यांनी संशयित प्रमोद डांगरे यास फोन केला असता त्याने सांगितले की, शनिवारी रात्री सुधीर भालेराव व सुनील गांगुर्डे, मुकेश मगर आणि मी कुमारा बारमध्ये गेलो होते़ तिथे मद्यप्राशन करीत असलेल्या हर्षलला दुचाकीवर बसवून आम्ही महादेववाडीत घेऊन गेलो़ त्या ठिकाणी हर्षल याचे गांगुर्डे , भालेराव व मगर यांच्यामध्ये भांडण झाले व धक्काबुक्कीत हर्षल खाली पडला़ यावेळी हर्षलने मारण्याची धमकी दिल्याने त्यास मारहाण केल्याने तो जखमी झाला़ त्यानंतर त्यास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याचे डांगरे याने सांगितले़
संशयित प्रमोद डांगरे, सुनील गांगुर्डे व सुधीर भालेराव व मुकेश मगर या चौघांनी हर्षल साळुंखे यास बारमधून उचलून महादेववाडीत नेले़ तसेच अज्ञात कारणासाठी कशाच्या तरी साहाय्याने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात मारून गंभीर जखमी करून त्याचा खून केल्याचे घोडके यांनी फिर्यादीत म्हटले आहे़ या प्रकरणी सातपूर पोलिसांनी या चौघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे़
बजरंग दलाचे आक्षेप व पोलिसांकडे मागण्या
* हर्षल साळुंखे हा शुक्रवारी (दि़१८)रात्री साडेअकरा वाजेपासून बेपत्ता़
* शनिवारी (दि़१९) जिल्हा रुग्णालयात दाखल़
* मुंबई नाका परिसरात बेवारस स्थितीत आढळल्याचे पोलिसांचे म्हणणे़
* अज्ञात व्यक्तीने जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याची नोद (हा अज्ञात व्यक्ती कोण)
* मयत हर्षलची दुचाकी व मोबाईल सातपुरला आढळला़
* १८ तारखेला अज्ञात व्यक्ती घेऊन गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद़
* सातपूर पोलीस ठाण्यात कार्यकर्त्यांचा दोन तासाच्या ठिय्या आंदोलनानंतर गुन्हा दाखल़
* या खूनाची सखोल चौकशी करा़
डांगरेसोबत पोलिसांचे संबंध
सातपूर पोलिसांचे संशयित प्रमोद डांगरेसोबत संबंध असल्याने सुरुवातीला ते अकस्मात मृत्यू आहे असे सांगून गुन्हा दाखल करून घेत नव्हते़ रविवारी सातपुर पोलीस ठाण्यात बजरंग दलाने अडीच तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर पोलीस यंत्रणा हलली़ बारच्या मालकाकडील सीसीटीव्हीची फुटेजची तपासणी केल्यानंतर त्यात चौघे संशयित हर्षलला घेऊन जाताना स्पष्ट दिसते़ या चौघांनी महादेववाडीत नेत मारहाण करून खून केला व त्यानंतर अपघात झाल्याचे सांगत उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले़ या चौघा संशयितांना अटक करून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा़
- विनोद थोरात, जिल्हा संयोजक, बजरंग दल, नाशिक़